धुळे : मजुरांना घेऊन जाणाऱ्या भरधाव क्रुझर वाहनाचा अचानक टायर फुटल्याने वाहन उलटून अपघात झाला. २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास सावळदे तापी नदी पुलावर ही घटना घडली. त्याचवेळी मागून येणाऱ्या अज्ञात अवजड भरधाव ट्रक वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते वाहन पुलाचे कठडे तोडून तापी पात्रात कोसळले. या अपघातात क्रुझरमधील तीन जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, वैजापूर येथून क्रुझर वाहन (क्र. एमपी ०९ एफ ए ६४८७) मजूर घेऊन मध्यप्रदेश राज्यातील सेंधवाकडे जात होते. त्यादरम्यान मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर तालुक्यातील सावळदे तापी नदी पुलावर क्रुझर वाहनाचा अचानक टायर फुटल्याने वाहन उलटून अपघात झाला.
या अपघातात क्रुझरमधील मजूर किरकोळ जखमी झाले. त्यांना तत्काळ शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत ठोस माहिती मिळु शकलेली नाही. घटनास्थळी पुलाचे कठडे तुटल्याचे दिसून येत आहे. घटनास्थळी शिरपूर शहर व नरडाणा पोलिसांनी दाखल होत मदत कार्य केले.
दरम्यान, मागून येणाऱ्या अज्ञात अवजड भरधाव ट्रक वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते वाहन पुलाचे कठडे तोडून तापी पात्रात कोसळले.
क्रुझर वाहनातील जखमी
विक्रम हातु मोरे, संध्या विक्रम मोरे (वय 4), सुभाष भिकला देवरे हे जखमी झाले आहेत.