राज्यातील सरपंच पाेटनिवडणुकीची तारीख जाहीर

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने सरपंच रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार असल्याची घाेषणा गुरुवारी जाहीर केली आहे. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांचे निधन, राजीनामा, अपात्र किंवा अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींसाठी ही पोटनिवडणुक असणार आहे. 

राज्यातील सुमारे २ हजार ६२० ग्रामपंचायतीतील ३ हजार ६६६ सदस्य आणि १२६ थेट सरपंच रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी मतदान होणार आहे.  या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज २५ एप्रिल ते २ मे २०२३ या कालावधीत दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. उमेदवारी अर्जाची छाननी ३ मे २०२३ रोजी होईल. उमेदवारी अर्ज ८ मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल असेही आयाेगाने नमूद केले. 

१८ मे २०२३ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागात मात्र दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी १९ मे २०२३ रोजी होऊन निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती आयाेगाने दिली. 

https://twitter.com/hashtag/SEC_Maharashtra?src=hashtag_click