राज्यात विधानसभेचा निकाल लागून, मंत्रिमंडळाचा विस्तार होऊनही काही महत्त्वाच्या पदांवरून महायुतीतील रस्सीखेच सुरूच होती. विशेषतः नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदांवरून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून चढाओढ होती. मात्र, आता नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटल्याचे संकेत मिळाले आहेत.
गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी
सूत्रांच्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हेच होणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या दृष्टीने नियोजन आणि प्रशासकीय समन्वय राखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) हे पद स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या पालकमंत्रीपदावर दावा कायम ठेवला होता. आणि आता अखेर भाजपाकडेच नाशिकचं पालकमंत्री पद राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2 वर्षानंतर सिंहस्थ कुंभमेला होणार असून, त्याअनुषंगाने सर्व तयारीसाठी भाजप हा पालकमंत्री पद स्वत:कडेच ठेवणार असल्याचं समजतं. महाजन यांच्याकडे यापूर्वीही पालकमंत्रीपदाची जबाबदारी होती आणि त्यांनी त्या काळात घेतलेल्या निर्णयांमुळे भाजपमध्ये त्यांना हे पद पुन्हा देण्यावर एकमत झाले आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजूनही अनिश्चितता
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय मात्र अद्यापही रखडलेलाच आहे. कोणत्या पक्षाकडे हे पद जाईल, याबाबत महायुतीमध्ये अजूनही स्पष्टता नाही. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या दोन्ही पक्षांनी हे पद मिळावे म्हणून जोर लावला आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कधी सुटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील अनेक पालकमंत्रीपदे निश्चित करण्यात यश आले असले, तरी काही ठिकाणी अद्याप तडजोडीच्या चर्चा सुरू आहेत. नाशिकप्रमाणेच रायगडच्या पालकमंत्री पदावरही लवकरच तोडगा निघेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.