जिल्हातील 1952 पासूनच्या निवडणुकीचा मागोवा असलेली पूर्वपीठिका प्रसिद्ध

जळगाव :  देशात लोकसभेची  सार्वत्रिक निवडणूक  सुरु आहे. निवडणुकीत सर्वाधिक लोकशिक्षणाचे कार्य प्रसारमाध्यमाकडून केले जाते. त्यासाठी  जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या सहकार्याने, जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाकडून निवडणुकीचा १९५२ पासूनचा मागोवा घेतलेली जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पूर्वपिठीकेचे प्रकाशन  सोमवार १५ एप्रिल रोजी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील हे उपस्थित होते.

लोकसभानिवडणुकीच्या अनुषंगाने माध्यमे तसेच अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या या पूर्वपिठीकेत जळगाव जिल्ह्यातील १९५२ सालापासून २०१९ पर्यंत घेण्यात आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील विजय पराभूत उमेदवार, त्यांना मिळालेले मतदान याबाबतचा सर्वंकष आढावा घेण्यात आला आहे.  माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीच्या कामाकाज, आदर्श आचार संहितेत ‘काय करावे, काय करू नये ‘ या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.  या पूर्वपीठिकेत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद, व अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रावेर अंकुश पिनाटे यांचे आवाहन पर मनोगत प्रसिद्ध करण्यात आले आहे.  त्यासोबतच प्रथमच या जिल्ह्यातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे छायाचित्रासह माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकसभा सार्वजनिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने महत्वाचे दूरध्वनी क्रमांक देखील या पुस्तिकेत प्रकाशित करण्यात आले आहेत.   या पुस्तिकेसाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरविंद अंतुर्लीकर व जिल्हा निवडणूक शाखेचे सहकार्य लाभले आहे.