बटण दाबूनही लाईट लागला नाही, ‘या’ मतदान केंद्रावर गोंधळ

---Advertisement---

 

राज्यातील २९ महापालिकांसाठी आज मतदान सुरू असतानाच अनेक ठिकाणी गोंधळ, तक्रारी आणि वादाच्या घटना समोर आल्या आहेत. काही शहरांमध्ये तांत्रिक अडचणींची चर्चा होत असताना, तर काही भागांत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे चित्र आहे. पुणे, मुंबई, धुळे आणि पालघर जिल्ह्यातील घडामोडींमुळे निवडणुकीचा दिवस अधिकच तणावपूर्ण ठरला आहे.

पुण्यातील प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटासमोर मोठी अडचण उभी राहिली आहे. या प्रभागात घड्याळ चिन्हावर चार उमेदवार निवडणूक लढवत असताना, तुतारी चिन्हावर दोन बंडखोर उमेदवार मैदानात उतरले आहेत. दिलीप शंकर अरुंदेकर आणि अक्षदा प्रेमराज गदादे यांना पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी ती सूचना धुडकावून लावली. याहून गंभीर बाब म्हणजे अधिकृत उमेदवार नसतानाही या दोघांनी प्रचारात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे फोटो वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराविरोधात ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

याच पुण्यात मतदान प्रक्रियेदरम्यान ईव्हीएमबाबतही आक्षेप नोंदवण्यात आला. अंकुश काकडे यांनी मतदान करताना मशीनमध्ये बिघाड झाल्याचा दावा केला आहे. चौथ्या क्रमांकाचे बटण दाबल्यानंतर संबंधित दिवा न लागल्याचे त्यांनी सांगितले. तक्रार नोंदवून घेतली जात नाही, तोपर्यंत आपण मतदान केंद्र सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांशी त्यांचा वाद झाला.

मुंबईत चेंबूर परिसरातील प्रभाग १५३ मध्ये मध्यरात्री तणाव निर्माण झाला. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी एका व्यक्तीला संशयास्पद ओळखपत्रासह मतदान केंद्राच्या परिसरात फिरताना पकडले. या घटनेनंतर स्थानिक आमदार तुकाराम काते आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद झाला. रविंद्र महाडीक नावाच्या व्यक्तीला गोवंडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो बीएमसी शाळेतील पोलिंग बूथमध्ये मध्यरात्री का गेला होता, याचा तपास निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस करत आहेत.

धुळे शहरात मतदान केंद्रांच्या नियोजनावरून प्रशासनावर टीका होत आहे. शिवसेनेचे महानगरप्रमुख संजय वाल्हे यांनी अनेक केंद्रे मतदारांच्या घरांपासून दूर ठेवल्याचा आरोप केला आहे. काही केंद्रांची ठिकाणे शेवटच्या क्षणी बदलण्यात आल्याने नागरिकांना मतदान केंद्र शोधताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, पालघर जिल्ह्यातील नालासोपारा पूर्वेतील पेल्हार फाटा येथे मध्यरात्री एका कारमधून मोठ्या प्रमाणात दारूचा साठा जप्त करण्यात आला. शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांनी संशयावरून ही गाडी थांबवली असता तब्बल २९ बॉक्स दारू आढळून आली. मतदारांना आमिष दाखवण्यासाठी ही दारू नेली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पेल्हार पोलिसांनी वाहनासह दारू जप्त केली असून, हा साठा नेमका कुणासाठी होता, याचा तपास सुरू आहे.

एकूणच, महापालिका निवडणुकीचा दिवस राज्यातील अनेक भागांत गोंधळ, तक्रारी आणि कारवाईच्या घटनांनी गाजताना दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---