माणसाच्या जिद्दीपुढे शारीरिक मर्यादा काहीच अडथळा ठरत नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे भुसावळ येथील दिव्यांग मुलगी राशी प्रवीण पाटील हिने. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राशीने तोंडाने एक अप्रतिम ॲक्रेलिक पेंटिंग साकारून त्यांना भेट दिली.
आज गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन राशीने स्वहस्ते (तोंडाने) तयार केलेले पेंटिंग त्यांच्या हस्ते सुपूर्द करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी तिच्या विलक्षण प्रतिभेने पालकमंत्र्यांसह उपस्थित सर्वांना भारावून टाकले. केवळ चित्रकलेत नव्हे, तर राशीने जिभेने मोबाइल वापरून पियानो वाजवून उपस्थितांना आश्चर्याचा धक्का दिला. तिचा आत्मविश्वास, कलागुण आणि मनोबल पाहून मंत्री गुलाबराव पाटील यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात तिचे व तिच्या कुटुंबाचे भरभरून कौतुक केले.
‘राशी ही केवळ एक कलाकार नाही, ती एक प्रेरणास्त्रोत आहे. तिच्यात असलेल्या विलक्षण ऊर्जे ने आणि जिद्दीने संपूर्ण समाजाला दिशा मिळेल,’ असे उद्गार पालकमंत्री पाटील यांनी काढले. त्यांनी राशीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. राशीसोबत तिचे वडील प्रवीण पाटील, आई नेहा पाटील, भाऊ सौरभपाटील, तसेच शिवसेनेचे दीपक धांडे उपस्थित होते. ही घटना केवळ एक भेट नव्हे, तर कलात्मकता, संघर्ष आणि सकारात्मकतेचा संगम आहे. दिव्यांगत्वावर मात करून रसिकांच्या हृदयात घर करणाऱ्या राशी पाटीलचे आयुष्य उजळत राहो, अशी प्रार्थना यानिमित्ताने सर्वत्र होत आहे.