अमळनेर मतदारसंघातील रस्त्यांचे भाग्य उजळणार!

तरुण भारत लाईव्ह। १५ जानेवारी २०२३। अमळनेर मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी पीएमजीएसवाय योजनेअंतर्गत तिसर्‍या टप्प्यासाठी 1537.95 लाखांचा निधी आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला आहे.

अमळनेर मतदारसंघातील दळणवळणासाठी महत्त्वाच्या असलेल्या रस्त्यांच्या निधीसाठी आमदार अनिल पाटील प्रयत्नशील होते. अनेक वर्षापासून मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांना रस्त्यांचा बिकट प्रश्न भेडसावत होता. आमदार अनिल पाटील हे मागच्या दीड ते दोन वर्षांपासून ग्रामीण भागातील रस्त्यांच्या निधीसाठी पाठपुरावा करत होते. अखेर 1537.95 लाखांचा निधी पीएमजीएसवाय योजनेअंतर्गत मंजूर झाल्याने आमदारांनी समाधान व्यक्त केले. या निधीतून अमळनेर तालुक्यातील मारवड जैतपीर-6 किमी रस्त्यासाठी 407.91 लाख, मुडी- बोदर्डे- भरवस- लोणपंचम- सबगव्हाण- चौबारी 9 किमी रस्त्यासाठी 724.39 लाख, तर पारोळा तालुक्यातील शेवगे-पुनगाव-शेवगे बु.-कंकराज-रत्नपिंप्री 6 किमी रस्त्यासाठी 405.65, असा एकूण 1537.95 लाखांचा निधी मतदारसंघासाठी मंजूर झाला.लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. या भागातील ग्रामस्थांनी मंजूर झालेल्या कामाबद्दल आमदार पाटील यांचे आभार मानले आहेत.