तरुण भारत लाईव्ह न्यूज । प्रा.डॉ. अरुणा धाडे ।
वाल्मिकी रामायणातील उल्लेखानुसार प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि देवी सीता 14 वर्षांच्या वनवास काळात दहाव्या वर्षी नाशकात आले होते. इथल्या गोदावरी किनाऱी पाच वटवृक्षांच्या सान्निध्यात पर्णकुटी बांधून जवळजवळ दोन वर्षे वास्तव्यास राहिले. त्याच जागी आपल्या सर्वांच्या परिचयाचे आजचे ‘श्री काळाराम मंदिर’ आहे.
‘रामायणकालिन’ अस्तित्व लाभलेले हे मंदिर तसे खूप जुने आहे. अंदाजे सातव्या ते अकराव्या शतकाच्या राष्ट्रकूट काळातले असावे. ‘नागर स्थापत्य शैली’ असलेल्या मंदिरातील सुंदर कोरीव काम पाहण्यासारखे आहे. कधीच सुकून गेलेल्या फुलांचा सुगंध मागे राहावा आणि त्या सुगंधात आपण फुलांचा ताजेपणा शोधावा, तसं या मंदिर परिसरात आल्यावर होतं. काळाच्या कुठल्यातरी पडावाच्या अवशेषांना बघताना, तेव्हाच्या मानव सभ्यतेच्या वैभवात आपण नकळत गुंतले जातो.
परकीय आक्रमणाचा दंश हिंदू प्रजेने आणि मंदिरांनी अनेक वेळी झेलला आहे. अशा आक्रमणात हे मंदिरसुद्धा कित्येक वेळी उद्ध्वस्त झाले. त्यावेळच्या बिकट परिस्थितीत मंदिरातील ब्राह्मणांनी मूर्ती गोदावरीत लपवल्या. काळ पुढे सरकत गेला.
कित्येक वर्षांनंतर नागपंथीय साधूंना अरूणा-वरूणा नद्यांच्या संगमावर राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती सापडल्या. तिन्ही मूर्ती गोदावरीच्या वेगवेगळ्या पात्रात सापडल्या. ज्या ठिकाणी जी मूर्ती सापडली तसे त्या ठिकाणाला नाव प्राप्त झाले. जिथे राममूर्ती सापडली ते आजचे ‘रामकुंड’ आहे. जिथे लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते ‘लक्ष्मणकुंड’ आहे. सीतेची मूर्ती सापडली ते ‘सीताकुंड’ आहे.
अलिकडचा इतिहास बघायचा तर नाशिक प्रांतचे सरदार रंगराव ओढेकरांना स्वप्नात ‘दृष्टांत’ झाला की गोदावरी नदीत ‘काळ्या’ रंगाची रामाची मूर्ती आहे. त्यांनी नदीतून मूर्ती काढली. माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांचा सल्ला घेत 1790 साली हे मंदिर बांधले. त्यांच्या कार्याला साधूवाद म्हणून मंदिर प्रांगणात सरदार ओढेकरांचा पुतळा आहे.
काळाराम मंदिर स्थापत्यात ‘पाषाण जोडण्याचा’ एक विशेष प्रकार आढळतो. सिमेंट चुन्याचा कुठेही वापर न करता आकारबद्ध दगड, एकमेकांत अडकवत, संतुलन साधत, एकावर एक रचले गेले आहेत. अशीच रचना ‘त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराची’सुद्धा आहे, याचे कारण कदाचित एकाच कालखंडात किंवा एकाच स्थापत्य शैली प्रभावात निर्माण कार्य झाले असावे. मंदिराच्या मंडपातील एक गोष्ट पटकन आपले लक्ष वेधते, ती म्हणजे हनुमानाची आपल्या प्रभू रामाच्या चरणांकडे बघतानाची सुंदर भावमुद्रा.
प्रभू रामाची भारतभर अनेक मंदिरे आहेत, पण नाशिक पंचवटीतील रामाला काळा का म्हणतात, असा मला प्रश्न पडायचा? रामायणातील एका प्रसंगातून आणि काही संदर्भ साहित्यातून ह्या प्रश्नाचे उत्तर सापडले. तो प्रसंग असा की, पंचवटीत असताना शूर्पनखेच्या त्रासाला कंटाळून रामाने युद्धाचे आवाहन केले. भयंकर युद्ध झाले! त्यात तिचे नाक, कान कापले गेले. या अपमानाचा प्रतिशोध म्हणून शूर्पणखेने 14 हजार राक्षसांसह त्यांच्यावर आक्रमण केलं. प्रचंड शत्रुबल बघून प्रभू रामाने विराट ‘कालरूप’ धारण केलं आणि सर्व राक्षसांचा वध केला. रामाचे ‘काल’ विक्राळ रूप पुढे ‘कालराम’ होत, ’काळाराम’ झाले. तेच आजचे ‘काळाराम’ मंदिर आहे. या आधीच्या बहुतांश प्रसंगी रामाचे तसे आपल्याला ‘सौम्य’ रूपच बघायला मिळते.
वर्षभर भरभरून वाहणार्या भक्तीच्या गोदा प्रवाहात विशेष भरती चैत्र महिन्यातील ‘रामनवमी’च्या उत्सवाला येते ! त्यावेळी इथल्या कणाकणात ‘राम’ असतो आणि ‘रामात’ कणकण सामावतो.