रावेर : रावेर विधान सभा मतदार संघाच्या विकासासाठी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाकडे पक्षाच्या उमेदवारी अर्ज देऊन उमेदवारी मागीतल्याची माहिती माजी नगराध्यक्ष दारा मोहंमद यांनी दिली.
दारामोहंमद जफर मोहंमद, इंटकचे भगतसिंग पाटील व माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन या तिघांनी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे रावेर विधान सभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचा अर्ज सादर केला. याबाबत आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
याप्रसंगी दारा मोहंमद म्हणाले की, रावेर शहरासह मतदार संघाचा पाहिजे तसा विकास झाला नाही. बीड जिल्ह्यात जाऊन एका नगरपालिकेला भेट देऊन जास्तीत जास्त निधी कसा आणता येतो याचा आपण अभ्यास केला आहे. आपणास काग्रेसची उमेदवारी मिळाल्यास आपण हमखास निवडून येऊन मतदार संघाच्या विकासासाठी निधी आणून विकास करून दाखवू . यासाठी पक्षाने उमेदवारी द्यावी.
यावेळी भगतसिंग पाटील, ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष राजीव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . यावेळी या पत्रकार परिषदेत आर. के. चौधरी, माजी नगरसेवक आसिफ मोहम्मद, एस. आर. चौधरी, माजी नगरसेवक जगदीश घेटे, बिसन सपकाळ, धुमा तायडे, सावन मेढे, सरपंच समाधान पाटील, कलिंदर तडवी, निलेश महाजन, आणि कैलास वाणी हे उपस्थित होते.