डोंबिवली : मित्रांमध्ये झालेल्या वादातून तिघांनी मिळून तरुणाचा प्रायव्हेट पार्टच कापला. ही खळबळजनक घटना डोंबिवलीतील गोळवली परिसरात घडली आहे. तरुणाला मुंबईतील एका पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांत तिघांविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला.
संजय कुमार असे जखमी तरुणाचे नाव आहे तर सुरेंद्र राम, सोनू राम आणि करण राम अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सूत्रानुसार, डोंबिवलीमधील गोळवली परिसरात सदर चार जण एमआयडीसीमध्ये काम करत असून एकाच खोलीत राहत होते. मंगळवारी रात्रीचा सुमारास या चौघांनी पार्टी केली. या पार्टीत दारू प्यायल्यानंतर चौघांमध्ये काही कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, या वादातून सोनू करण आणि सुरेंद्र यांनी संजय कुमार याला बेदम मारहाण सुरू केली.
इतकेच नव्हे तर या तिघांनी धारदार शस्त्राने संजय कुमार याचा प्रायव्हेट पार्टच कापला. या हल्ल्यात संजय कुमार गंभीर जखमी झाला, त्याला उपचारासाठी मुंबई येथील पालिका रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी मानपाडा पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी सोनू राम आणि करण राम या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस सुरू केला आहे.