जेजुरीतील खंडेरायाचा गाभारा ‘इतके’ दिवस राहणार बंद

तरुण भारत लाईव्ह । २८ ऑगस्ट २०२३। जेजुरी सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो या नावाने प्रसिद्ध आहे. खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. आता दुरुस्तीच्या कामासाठी जेजुरी येथील येथील खंडोबा गडावरील मुख्य मंदिराचा आणि अश्वाचा गाभारा सोमवारपासून दीड महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून, गाभार्‍यात जाता येणार नाही. दि. ५ ऑक्टोबरपर्यंत दुरुस्तीचे काम चालणार असल्याची माहिती खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली.

खंडोबा गडावर विकास आराखड्याची कामे सुरू असून गडाचे जतन करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या आणि उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. खंडोबा देवस्थानच्या कार्यालयात मंदिरातील विकासकामांच्या नियोजनासंदर्भात पुजारी, सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी, मानकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीच्या आयोजन केले होते. याप्रसंगी मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, अ‍ॅड. पांडुरंग थोरवे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अनिल सौंदाडे, मंगेश घोणे, ड. विश्वास पानसे, अभिजित देवकाते, व्यवस्थापक राजेंद्र जगताप, प्रमोद चव्हाण आदी उपस्थित होते.

गाभार्‍याचे काम सुरू असताना गडावर येणार्‍या ज्या भाविकांना अभिषेक, महापूजा करावयाची त्यांनी पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करता यावी. मुख्य गाभार्‍याचे काम पूर्ण झाल्यावरच पंचलिंग मंदिराची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. विकासकामांना सहकार्य करण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे. बैठकीसाठी पालिकेतील विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, महेश जेजुरीकर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, छबन कुदळे, कृष्णा कुदळे, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, पंकज निकुडे, नितीन राऊत, प्रकाश खाडे, माधव बारभाई, समीर मोरे आदी उपस्थित होते. विकासकामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी समिती तयार केली आहे. मुख्य गाभारा, अश्वाचा गाभारा, पंचलिंग मंदिर, भुलेश्वर मंदिर, भंडार घर आणि तुळजाभवानी मंदिराचे काम होणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.