जळगाव : राज्यात गुन्हेगारीसह ”हिट अँड रन”च्या केसेस दिवसेन दिवस वाढताना दिसत आहेत. अशातच जळगावमधून अशीच एक अपघाताची बातमी समोर आली आहे, एका भरधाव कारने पायी चालणाऱ्या आईसह बालिकेला धडक दिली. यात बालिकेचा जागीच मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील पाडसे रस्त्यावर हा अपघात घडला. रेखमा विजय नाईक (८) असं मृत बालिकेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता विजय नाईक या त्यांची आठ वर्षाची मुलगी रेखमा सोबत पाडसे रस्त्याच्या कडेने विहिरीवर पाणी भरण्यास जात होते. त्यावेळी पाडसे कडून चौबारीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने (क्रमांक एमएच ०२ बीजे ५४२०) भरधाव वेगाने जात रेखमा हिला धडक दिली.
त्यानंतर वाहनचालक अमळनेरच्या दिशेने पळून गेला. मुलीचे वडील विजय नाईक व ग्रामस्थांनी मुलीकडे धाव घेत तिला खाजगी वाहनाने अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
घटनेप्रकरणी मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ शरीफ पठाण हे करीत आहेत. दुर्घटना झाल्याचे व चालक पळून गेल्याचे कळताच काही ग्रामस्थांनी अमळनेरकडे धाव घेतली. व सदर वाहनचालकाला पकडत चोप दिला.
यावेळी मारवड पोलिसांनी सदर चालकास व वाहनाला ताब्यात घेतले आहे. विकास प्रकाश वानखेडे (वय २५, रा. भालेगाव ता. मलकापूर जि. बुलढाणा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला शुक्रवारी अमळनेर सत्र न्यायालयात हजर केले असता जामीन मंजूर केला आहे.