Assembly Elections : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहेत. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 155 ते 160 जागा, शिंदे गट 80 ते 85 जागा आणि अजित पवार गटाला 55 ते 60 मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आज रात्री यावर अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना महायुतीचा हा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते. आज रात्री उशिरा मुंबईत महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये पुन्हा एकदा महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तिन्ही पक्ष जवळपास सर्व विद्यमान आमदारांना रिपीट करू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या शिंदे गटाने विदर्भातील 62 पैकी 24 जागांवर दावा केला आहे. या जागांवर शिवसेना शिंदे गट आपले नशीब आजमावणार आहे. आता या मुद्द्यावर दोन्ही पक्षांमध्ये काय निर्णय होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.
दुसरीकडे, निवडणूक आयोगाचे पथकही आज संध्याकाळी उशिरापर्यंत मुंबईत पोहोचणार आहे. निवडणूक आयोगाची टीम उद्या म्हणजेच शुक्रवारी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहे.
यानंतर आयोगाची टीम अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता निवडणूक आयोग मुंबईत पत्रकार परिषद घेईल. त्यानंतर महाराष्ट्रातील निवडणुकीची स्थिती स्पष्ट होईल.