जामनेर : तालुक्यात देऊळगाव गुजरी येथे पत्नीसह नऊ महिन्याच्या मुलीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पतीशी वाद झाल्याने प्रतिभा झनके तिच्या नऊ महिन्याच्या मुलीसह माहेरी राहत होत्या. त्या देऊळ गाव गुजरीचे पोलीस पाटील राजेंद्र इंगळे यांची मुलगी होत्या. दरम्यानच्या काळात पती पत्नी मधील वाद अधिकच वाढला होता. पत्नी सासरी नांदायला येत नसल्याचा राग पतीच्या मनात होता. यातच पती विशाल झनके हा पत्नीला भेटीसाठी तिच्या माहेरी आला होता. यावेळी घरात पती पत्नी व त्यांची मुलगी यांच्याशिवाय कोणीच नव्हते. थोड्या वेळाने कुटुंबीय घरात आले. घरात प्रवेश करताच त्यांना प्रतिभा झनके व तिची चिमुकलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याचे दिसले. तसेच जवळच्या एका विहिरीत त्यांचा पती विशाल झनके याचा मृतदेह ही आढळून आला, या घटनेत आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून एक संपूर्ण कुटुंब बेचिराख झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस) या घटनेचा सखोल तपास करत आहेत.