जागतिक व्यापारयुद्धात स्वदेशीचे महत्त्व!

#image_title

trade war-Trump-USA अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डाेनाल्ड ट्रम्प यांनी चीन, कॅनडा इत्यादी देशातून अमेरिकेत आयात करण्यात येणाऱ्या उत्पादनांवरील कर वाढविण्याचा आदेश दिला. त्यामुळे जागतिक व्यापारयुद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जागतिक व्यापारयुद्धातून भारतीयांनी वेळीच धडा घेतलेला बरा. भारतीय नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करणे आवश्यक आहे. देशात तयार हाेणाऱ्या वस्तूंची माेठ्या प्रमाणावर खरेदी करून आपल्याच देशातील कारागिरांच्या हाताला अधिकचे काम देता येईल. परिणामी, लघुउद्याेगांना चालना मिळून कारागिरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे समाधान नागरिकांना मिळेल आणि भारतही प्रत्येक बाबतीत इतर देशांकडे न वळता आत्मनिर्भर हाेईल. साेबतच पंतप्रधान नरेंद्र माेदींचे भारताला जागतिक स्तरावर तिसरी आर्थिक महाशक्ती करण्याचे स्वप्नही लवकरच पूर्ण हाेईल.

डाेनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून आयात हाेणाऱ्या उत्पादनांवर 10 टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावण्याची घाेषणा केली. या घाेषणेला काही तासांतच चीनने अमेरिकेतून आयात करण्यात येणाऱ्या विविध वस्तूंवर 10 ते 15 टक्के आयातशुल्क लावण्याची घाेषण करून प्रत्युत्तर दिले. एवढेच नाही तर, गुगलची चाैकशी करण्याबराेबरच इतर व्यापार संबंधित उपाययाेजना केल्या जाणार असल्याचे चीनने जाहीर केले आहे. चीनच्या व्यापार व वाणिज्य मंत्रालयाने याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमेरिकेने केलेली एकर्ती करवाढ ही जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे उल्लंघन आहे. चीन व अमेरिकेच्या व्यापारी संबंधांना नुकसानकारक आहे. देशाचे व्यापारी हित पाहता अमेरिकेतून आयात करण्यात येणाऱ्या काेळसा, द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) यावर 15 टक्के अधिक कर लावण्यात येणार आहे.

Nari Shakti Half page

याशिवाय कच्चे तेल, कृषी उपकरणे, माेठ्या कार, पिकअप ट्रक इत्यादींवर 10 टक्के अधिक आयातशुल्क आकारण्यात येईल. अमेरिकेने लावलेल्या आयात शुल्काविराेधात जागतिक व्यापार संघटना (डब्ल्यूटीओ) कडे याचिका दाखल करण्यात आल्याचेही चीनच्या व्यापार व वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, अमेरिकेने कॅनडा व मेक्सिकाे यांच्यावर 25 टक्के आयात शुल्क लावण्याच्या निर्णयाला पुढील महिनाभरासाठी स्थगिती दिली आहे. मात्र, चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या मालावर मंगळवारपासूनच 10 कर लावण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम चिनी वस्तूंच्या किमतीवर हाेऊन त्या महागणार आहेत. चीनमध्ये तयार हाेणाऱ्या वस्तू जगभरात स्वस्त दरात विकल्या जातात. त्याचा परिणाम अमेरिकेत तयार हाेणाऱ्या वस्तूंच्या किमतीवर हाेताे. भारतातही यापूर्वी मेड इन चायना उत्पादनांना माेठ्या प्रमाणात मागणी हाेती. कारण या वस्तू भारतीय उत्पादनापेक्षा स्वस्त हाेत्या.

अगदी फटाक्यांपासून विद्युत दिव्यांच्या माळा, माेबाईल, सायकल इत्यादीच्या भारतीय बाजारपेठेवर चीनचे एकप्रकारे अधिराज्य हाेते. अमेरिकेत देखील चीनने तसाच प्रयत्न चालविला हाेता. त्यामुळे अमेरिकन उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ट्रम्प यांनी हे पाऊल उचलले असावे. तसेच, इंग्रजांनी जवळपास संपूर्ण जगावर वसाहतवादातून राज्य केले. आजही जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यात जागतिक बाजारपेठा काबीज करण्यावरून व्यापारयुद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चीनने अमेरिकेकडून आयात करण्यात येणाèया वस्तूंवर आयातशुल्क वाढविण्याच्या निर्णयाचे मेक्सिकन राष्ट्राध्यक्षांनी स्वागत केले आहे. त्यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज तस्करी राेखण्यासाठी सीमेवर 10 हजार सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यास सहमती दिली. त्यानंतर ट्रम्प यांनी व्यापार कर लावण्याचा निर्णय मागे घेतला.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडाे यांनी देखील अमेरिकन उत्पादनांवर 25 टक्के कर लावण्याचा निर्णय जाहीर केला. त्यात मद्य, फर्निचर आणि संत्रा ज्यूसचा समावेश आहे. त्यांनी कॅनेडियन नागरिकांना अमेरिकन वस्तूंचा वापर न करता स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले आहे. या विषयातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिकाेसारख्या सहयाेगी देशांवर आयात शुल्क वाढवून एकप्रकारे व्यापारयुद्ध पुकारले आहे. याचा फायदा घेऊन चीनने या देशांसाेबत आपले संबंध मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. याचा परिणाम जागतिक व्यापारावर हाेणे निश्चित आहे. जागतिक करारानुसार भारतावरही या घटनेचे चांगले वाईट परिणाम हाेणे क्रमप्राप्त आहे. याचा विचार करून सरकार व नागरिकांनी वेळीच सावध हाेऊन स्वदेशीला प्राधान्य द्यावे, असे सुचवावेसे वाटते.