Indian Navy Day 2024: शौर्याचे प्रतीक आहे भारतीय नौदल; असा आहे इतिहास…

Indian Navy Day 2024: दरवर्षी भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.नौदलाचा अभिमान आणि कामगिरी दर्शविण्यासाठी भारतात नौदल दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय नौदलाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस मानला जातो.

आज भारतीय लष्कराचे नाव जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये घेतले जाते. त्यामागचे कारण म्हणजे भारताच्या तिन्ही सेना, लष्कर, वायुसेना आणि नौदल सर्व बाजूंनी देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असतात.

1971 मध्ये भारतीय नौदलाने पाकिस्तान विरूद्धच्या युद्धात कराची बंदरावर केलेला यशस्वी हल्ला चढविण्यात आला तो दिवस म्हणजे 4 डिसेंबर, त्यामुळे हा दिवस भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो.

भारतीय नौदलाचे महत्त्व आणि इतिहास.
ईस्ट इंडिया कंपनीने 1612 मध्ये भारतीय नौदलाची स्थापना केली. सन 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले होते. यात 3 डिसेंबर रोजी पाकिस्तानने भारतीय विमानतळांवर हल्ला केला होता. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय नौदलाने 4 आणि 5 डिसेंबरच्या रात्री हल्ल्याची योजना आखली. या ऑपरेशनला भारतीय नौदलाने ‘ऑपरेशन त्रिशूल’ नाव दिले होते. या ऑपरेशन अंतर्गत कराची बंदर आणि तेथे असलेल्या पाकिस्तानच्या नौदल मुख्यालयाला लक्ष्य करून ही कारवाई सुरू करण्यात आली.

या हल्ल्यासाठी भारताकडून एक मिसाईल बोट आणि दोन युद्धनौका पाठवण्यात आल्या होत्या. या युद्धनौकांनी रात्रीच कराची बंदराला वेढा घातला. भारतीय नौदलाने प्रथम कराचीच्या किनार्‍याजवळ जहाजांच्या एका गटावर हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानची अनेक जहाजे उद्ध्वस्त झाली होती. सोबत पाकिस्तानचे तेल टँकरही उद्ध्वस्त करण्यात आले होते.

कराची बंदरात तेलाचा साठा करणाऱ्या टँकरमध्ये लागलेली ही आग इतकी भीषण होती की, 60 किलोमीटर अंतरावरून दिसत होती. पुढचे अनेक दिवस ही आग धगधगत होती. भारतीय नौदलाच्या या हल्ल्यात पाकिस्तानचा कराची नौदल तळ पूर्णपणे उद्ध्वस्त होत पाकिस्तानचे शेकडो सैनिक ठार झाले होते. तेव्हापासून, भारतीय नौदलाचे सामर्थ्य आणि शौर्याच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिवस साजरा केला जातो.

भारतीय नौदलाची मुख्य कामे
भारताच्या समुद्री प्रदेशातील आपत्कालीन परिस्थितींमध्ये मदत करणे,भारताच्या समुद्री सीमांचे रक्षण करणे, भारताच्या समुद्री हितांचे रक्षण करणे, भारताच्या समुद्री प्रदेशात शांतता आणि स्थिरता राखणे,

अनेकदा बदलला नौदल दिवस
यापूर्वी रॉयल इंडियन नेव्हीने 21 ऑक्टोबर 1944 रोजी नौदल दिवस पहिल्यांदा साजरा केला होता. सामान्य लोकांमध्ये नौदलाबद्दल जागरुकता वाढावी हा त्यामागचा उद्देश होता. 1945 पासून दुसऱ्या महायुद्धानंतर 1 डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा करण्यात आला. त्यानंतर 1972 पर्यंत 15 डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा केला जात होता 1972 पासून फक्त 4 डिसेंबर रोजी नौदल दिवस साजरा केला जातो.