बांगलादेशच्या अखेरच्या जोडीने भारताच्या हातून विजय खेचून नेला!

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या अखेरच्या जोडीने भारताच्या हातून विजय खेचून नेला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 41.2 षटकात 186 धावांवर गारद झाला. केएल राहुलने सर्वाधिक 73 धावा केल्या. भारताच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने संयतपणे खेळ केला. पण भारताने सामना आपल्या बाजूने झुकवत बांगलादेशचे ९ विकेट्स मिळवेल होते. पण अखेरच्या जोडीने भारताला धक्का देत बांगलादेशला विजय मिळवून दिला.

टीम इंडियाने यावेळी बांगलादेशच्या पहिल्याच सामन्यात आपले तीन महत्त्वाचे बॅट्समन गमावले. शिखर धवन (७), रोहित शर्मा (२७) आणि विराट कोहली (९) धावा करून बाद झाले. संघाची धावसंख्या तीन गडी गमावून ४९ धावा होती. येथून राहुलने डाव सांभाळला. श्रेयस अय्यरने त्याला काही काळ साथ दिली आणि संघाची धावसंख्या ९२ पर्यंत नेली. अय्यर २४ धावा करून बाद झाला. त्यानंतर सुंदरने राहुलच्या साथीने डाव पुढे नेला. राहुलने सुंदरसोबत अर्धशतकीय भागीदारी केली. सुंदर आणि राहुलने ६० धावांची शानदार भागीदारी करता भारताचा डाव सांभाळला.

यानंतर शाकिबने झटपट विकेट्स घेतल्या मात्र राहुल मात्र आपली भूमिका चोख बजावत होता. राहुलने ७० चेंडूत ७३ धावा केल्या. आपल्या खेळीत या फलंदाजाने पाच चौकार आणि चार षटकार मारले. राहुल यावेळी शतक झळकावेल, असे वाटत होते. राहुलला यावेळी शतक पूर्ण करण्याची संधीही होती. पण राहुल शतक पूर्ण करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे भारताने या सामन्यात दीडशे धावांची वेस ओलांडली असली तरी त्यांना दोनशे धावा मात्र करता आल्या नाहीत.