जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघातील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना विकासाचे व्हिजन मांडण्याची संधी रोटरी क्लब ऑफ वेस्टतर्फे देण्यात आली होती.या परिसंवादात महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ व महाविकास आघाडीचे उमेदवार करण पावर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या परिसंवादात स्मिता वाघ यांनी प्रत्यक्ष तर करण पवार यांनी प्रत्यक्ष हजर न राहता आपल्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सहभाग घेतला. त्यांचे प्रतिनिधित्व उबाठा शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी केले.
स्मिता वाघ यांनी आपली आपली भूमिका ठामपणे मांडली जळगाव मतदार संघ दळणवळणाच्या साधनं रस्ते, रेल्वे, हवाई वाहतूकद्वारे कनेक्टेड असल्याने उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण आहे. युवकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांविण्यासाठी शहरात एमआयडीसीच्या विस्तारासाठी प्रयत्न केला जाईल. नवीन उद्योगांसाठी वातावरण निर्मिती करत आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल .यातून रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध होईल असे स्पष्ट केले. या लोकसभा मतदार संघात चार तालुके ड्राय झोनमध्ये मोडतात. या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी निम्न तापी प्रकल्प केंद्र शासनाच्या माध्यमातून पूर्ण केला जाईल. यातून तापी नदीतून वाहून जाणारे पाणी साठवून त्याचा सिंचनासाठी उपयोग होईल असे त्यांनी स्पष्ट केले.
संजय सावंत यांनी करण पवार उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने भूमिका मांडली. जिल्ह्यातील केळी व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे. केळीला फळाचा दर्जा मिळण्यासाठी केंद्र स्तरावर प्रयत्न केले जातील. अनेक तरुणांना नोकरीसाठी बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर उद्योगांना चालना देण्यासाठी एमआयडीसीच्या विकासावर भर असेल. सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न असेल. याप्रसंगी रोटरी वेस्टच्या अध्यक्षा सरिता खाचणे, रोटरी सचिव मुनिरा तरवारी, माजी अध्यक्ष गनी मेमन उपस्थित होते.