शिरपूर मर्चेंट बँकेतील घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात, आर्थिक अपहाराचा ४६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

---Advertisement---

 

शिरपूर : शहरातील एकेकाळच्या प्रख्यात शिरपूर मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेतील तत्कालीन कर्ज वितरण विभागाचा अधिकारी व तब्बल १३.७५ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार महेश ऊर्फ गोपाल पंडितलाल गुजराथी अखेर शिरपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तब्बल काही महिन्यांपासून फरार संशयित महेश गुजराथीला पकडण्यात पोलिसांना मिळालेले यश या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासातील मोठे पाऊल मानले जात आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. पोलिसांनी काटेकोरपणे तपास करत, संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि अखेर मुख सूत्रधाराला अटक करण्यात यश मिळवले. सध्या तो पोलीस कोठडीत असून, त्याच्याकडून पुढील तपास सुरू आहे.

या घोटाळ्याचे पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले आहेत. शिरपूर मर्चेंट बँकेत ठेवी ठेवणाऱ्या शेकडो ठेवीदारांचे आयुष्यभराचे कष्टाचे पैसे गमावण्याची वेळ आली होती. बँकेच्या लेखापरीक्षकांनी केलेल्या फिर्यादीनुसार, २५ मे २०२५ रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. २८५/२०२५) दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात भारतीय दंडसंहिता कलम ४०३, ४०९, ४२०, १२० (च) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम, १९९९ च्या कलम ३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात बँकेचे काही अधिकारी, कर्मचारी, माजी चेअरमन आणि कर्जदार, अशा ४६ जणांनी संगनमत करून तब्बल १३ कोटी ७५ लाख ८६ हजार २५३ रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती अहवालांतून समोर आली आहे. या संशयितांनी बनावट कर्जे, नियमबाह्य वितरण आणि खात्यांत फेरफार करून बँकेच्या ठेवीदारांची फसवणूक केली. गुन्हा दाखल होताच संबंधित संशयित फरार झाले होते. तथापि, तपासाधिकाऱ्यांनी संशयितांच्या ठिकाणांचा शोध घेत न्यायालयात त्यांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले जाण्यासाठी ठोस पुरावे सादर केले.

शासकीय वरिष्ठ अधिवक्ता ॲड. देवेंद्रसिंह तंवर, ॲड. नितीन चोरडिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशयितांनी कशा प्रकारे बँकेत भ्रष्टाचार केला आहे, हे उदाहरण देऊन स्पष्ट केले. परिणामी, विशेष न्यायालयाचे न्यायाधीश तापकिरे यांनी सुमारे ८० टक्के संशयितांना न्यायालयाने जामीन नाकारला. या कारवाईनंतर काही संशयितांनी न्यायालयीन कोठडीत प्रवेश केला असून, मुख्य संशयित महेश ऊर्फ गोपाल गुजराथी पोलिसांच्या हाती लागत्यामुळे या प्रकरणातील चौकशीचा वेग अधिक वाढला आहे. पोलिस तपासात अजूनही काही नव्या प्रकरणांची उकल होण्याची शक्यता आहे.

पूर्वी अटक झालेले संशयित न्यायालयीन कोठडीत!

यापूर्वी या प्रकरणातील संशयित कर्जदार जयपाल विजयसिंग गिरासे, भूषण अरुण चौधरी आणि निखिल अशोक अग्रवाल यांना पोलिसांनी अटक केली होती. ते तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या संशयितांनी नियमबाह्य पद्धतीने कर्ज घेतले असून, परतफेड न करता बँकेची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे.

कारवाईनंतर ठेवीदारांमध्ये दिलासा : डॉ. देवरे

अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी सांगितले की, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून, आर्थिक फसवणूक प्रकरणात सहभागी सर्वांना अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून या घोटाळ्यामुळे बँकेच्या ठेवीदारांमध्ये निर्माण झालेली अविश्वासाची भावना आणि आर्थिक असुरक्षितता मोठ्या प्रमाणावर होती. मात्र, पोलिसांनी केलेल्या निर्णायक कारवाईनंतर ठेवीदारांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.

कायदेशीर प्रक्रिया सुरू : पोलीस अधीक्षक धिवरे

या प्रकरणाबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले की, “आर्थिक गुन्हे हे समाजघातक असून, ठेवीदारांचा विश्वास तोडणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही. पोलीस पूर्ण दक्षतेने काम करत आहेत. ठेवीदारांचा पैसा परत मिळवण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.”

इतरांनाही अटकेची ठेवीदार, सभासदांची मागणी

शिरपूर तालुक्यात या प्रकरणाची चर्चा असून, बँकेच्या व्यवस्थापनातील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. अनेक ठेवीदारांनी न्याय मिळेल आणि जबाबदारांना शिक्षा होईल, अशी आशा व्यक्त केली आहे. या प्रकरणातील अद्याप प्रमुख संशयित तत्कालीन चेअरमन प्रसन्ना जयराज जैन आणि व्यवस्थापक संजय केशव कुळकर्णी यांच्यासह बँकेचे अधिकारी कापडी हेसुद्धा सुमारे पाच महिन्यांपासून फरार आहेत, त्यांनाही लवकर अटक करावी अशी मागणी बँकेचे ठेवीदार आणि सर्वसामान्य सभासदांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---