तरुण भारत लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२२ । तरूणाचे लग्न जमवून देण्याचा बहाणा करून महिलेकडून सुमारे 2 लाख 42 हजार रूपये घेत फसवणुक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांविरूध्द पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल आला. विशेष म्हणजे, या घटनेतून लग्न लावून देण्याचे अमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारी टोळी जिल्हयात सक्रिय असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालूबाई सुभाष पाटील रा.हिरापूर (ता.पारोळा) यांचा मुलगा योगेश याचा विवाह अपेक्षा गोवर्धन बोदरे ह.मु. एकोडी ता. तिरोडा जि.गोदिंया या तरूणीशी जमवून देतो म्हणून संशयीत अनिल संजय पाटील रा.सानेगुरूजी कॉलनी चोपडा ह.मु. एकोडी ता. तिरोडा जि.गोदिंया, जितेंद्र अशोक पाटील, नाना पांडुरंग पाटील दोन्ही रा. दगडसबगव्हाण ता.पारोळा यांनी मध्यस्थी केली होती. सदर विवाहाचा खर्च म्हणून संशयीत वधू अपेक्षा बोदरे, राहुल गोवर्धन बोदरे दोन्ही रा. एकोडी तसेच मध्यस्थी तिघे अशा पाच जणांनी तक्रारदार मालुबाई पाटील यांच्याकडून 1 लाख 21 हजार रूपये रोख घेतले. तसेच दि. 13 जुलै 2022 रोजी संशयीत नाना पाटील रा.दगडीसबगव्हाण यांच्या घरी योगेश याचा साखरपुडा केला होता. 18 ऑगस्ट 2022 रोजी नागेश्वर मंदिर उंदीरखेडा ता.पारोळा येथे लग्न लावून देण्याचे यावेळी निश्चित झाले होते.
दरम्यान सर्व पैसे उकळून घेतल्यानंतरही योगेश याचा विवाह ठरलेल्या तारखेला लागला नाही. लग्न लावण्यासाठी या संशयीतांनी पुन्हा तक्रारदाराकडे पैश्यांची मागणी करत लग्न मोडू असे धमकाविले होते. त्यानंतर पंधरा दिवसात पैसे परत करतो अशी बतावणी करून बदल्यात हात उसनवारीची नोटरी करून संशयीत अनिल पाटीलने 1 लाख 21 हजार रूपये तक्रारदाराकडून घेतले. दरम्यान तगादा लावूनही संशयीतांनी तरूणाचे ना लग्न लावून दिले ना तक्रारदाराला रक्कम परत केली.
मालूबाई सुभाष पाटील यांनी आपली फसवणुक झाल्याची खात्री पटल्यानंतर पारोळा दिवाणी न्यायालयात खटला दाखल केला होता. युक्तीवादाअंती कोर्टाने पाचही आरोपींविरूध्द आरसीसी 146/22 प्रमाणे भादवी कलम 420,465,467,471,120 (ब) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारोळा पोलिसांना दि. 12 डिसेंबर 22 रोजी दिले. फिर्यादीतर्फे अॅड. प्रशांत भिमराव ठाकरे (पारोळा) यांनी कामकाज पाहिले.