अडावद, ता. चोपडा । येथील लोखंडे नगरमध्ये राहणाऱ्या बापू हरी महाजन (३५) या तरुणाच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात अखेर अडावद पोलिसांना व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले. चिमूटभर ‘गाय छाप’ तंबाखू मागण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या या खून प्रकरणाने समाजमन सुन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ जणांना अटक केली असून या खून प्रकरणात एका १५ वर्षीय बालकाचा समावेश असल्याने त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. एकाला पोलीस कोठडी मिळाली आहे. जिल्हाभरात खळबळ उडवून देणाऱ्या या खून प्रकरणाचा अवघ्या एकाच दिवसात तपास लागल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
येथील भगवान नगरमध्ये मोकळ्या जागेवर बापू हरी महाजन (३५) या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दि. १ रोजी सकाळी उघडकीस आले होते. या तरुणाच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर जखमेच्या खुणा असल्याने कुणीतरी अज्ञातांनी रात्री बापूचा लाकडी दांड्याने तसेच दगडांनी ठेचून निघून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. घटनास्थळी कुठलेही सबळ पुरावे नसतांना खुनाचे रहस्य उलगडणे हे जिल्हा पोलीस प्रशासन तथा अडावद पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.
संपूर्ण पोलीस प्रशासननाने या गुन्ह्याच्या तपासासाठी सर्व सूत्रे वेगाने हलविली. या घटनेमुळे जिल्हा अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप हे अडावदला तळ ठोकून होते. अडावदचे सपोनि प्रमोद वाघ, पोउनि राजू थोरात, भरत नाईक, संजय धनगर, सुनील तायडे, सतीश भोई, विनोद धनगर, भूषण चव्हाण, किरण शिरसाठ, जयदीप राजपूत, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि गणेश वाघमारे, निलेश सोनवणे, प्रदीप चावरे, दीपक माळी, महेश सोमवंशी यांनी घटनास्थळाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला होता.
गावात उशिरा पर्यंत विकल्या जाणाऱ्या तसेच शालेय परिसरातही सर्रास विकल्या जाणाऱ्या गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थांमुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे त्यामुळे यावर तसेच गुन्हेगारी फोफावण्यास कारणीभूत असलेल्या इतर लहान मोठ्या व्यवसायांवर प्रतिबंध करुन पोलिसांनी अंकुश ठेवावा, असे जनम ानसांतून बोलले जात आहे.
अशी घडली घटना
३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर गावातील एका ओठ्यावर झोपलेल्या बापू महाजन याला जागवून त्याच्याजवळ गाय छाप तंबाखूची मागणी राज सुरेश म हाजन व चेतन ज्ञानेश्वर महाजन यांनी केली. बापूला याचा राग आल्याने या तिघांमध्ये झालेल्या शाब्दीक बाचाबाचीतून बापूने राजला मारले. याचा राग आल्याने राज व चेतन या दोघांनी बापूला मारहाण केली. तेथून भगवान नगरकडे नेत असताना लाकडी दांड्याने व दगडांनी ठेचून त्याचा निर्घणपणे खून केला व भगवान नगरमधील मोकळ्या जागेत बापूचा मृतदेह फेकून दोघे पसार झाले. गाय छाप तंबाखूचे क्षुल्लक कारण या घटनेचे निमित्त ठरले. व अवघ्या महिनाभरातच घडलेल्या तिसऱ्या खूनासारख्या गंभीर गुन्ह्याने हॅट ट्रिक साधून परिसरात खळबळ उडवून दिली.
सीसीटीव्ही फूटेज ठरले मार्गदर्शक मध्यरात्रीनंतर २ वाजेच्या
सुमारास राज व चेतन या दोघांनी गावातील एका ट्युबवेलच्या नळावर हातपाय धुवून अंगावरील कपड्यांवर काही डाग राहिलेत का याची पुसटशी चाचपणी केली होती. अखेर सुतावरुन स्वर्ग गाठणाऱ्या पोलीस यंत्रणेच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजच्या आधारे धागेदोरे हाती लागून त्या दिशेने तपासचक्रे फिरवीत या गंभीर गुन्ह्यातील आरोपी राज सुरेश महाजन (वय १९) रा. दुगर्गादिवी चौक अडावद व चेतन उर्फ लाल्या ज्ञानेश्वर महाजन (वय १५) रा. विखरण, ता. एरंडोल या दोघांना अडावद पोलीस तथा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. मयताचा मामा शांताराम पुना महाजन यांच्या फिर्यादीवरुन वरील दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.