जळगाव : नागपूर विशेष न्यायालयाने माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन आणि त्यांचे पुत्र मनीष जैन यांच्या विरोधात ईडीने दाखल केलेल्या तक्रारीवरून मनी लॉंड्रींगच्या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सक्तीवसुली संचलनालय अर्थात ईडीला नागपुर विशेष पीएमएलए कोर्टात मे. राजमल लखीचंद प्रा. लि.; आर. एल. ज्वेल्स व मानराज ज्वेल्स प्रा. लि. या फर्मच्या माध्यमातून केलेले व्यवहार संशयास्पद वाटत होते. यामुळे २६ जून रोजी ईडीने तक्रार दाखल केली होती. यावरील सुनावणीत न्यायालयाने पीएमएलए काद्याच्या अर्थात मनी लॉंड्रींगच्या अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
स्टेट बँकेकडून मे. राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रा. लि. यांनी कर्ज घेतले होते. हे कर्ज साडेतीनशे कोटीचे होते. या कर्जाची रक्कम ही इतरत्र वळविण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यासंदर्भांत स्टेट बँकेने पूर्वी सीबीआयकडे तक्रार केली होती. नंतर हे प्रकरण ईडीकडे वर्ग करण्यात आले आहे. हा खटला न्यायालयात सुरू झालेला आहे. या कारवाई करण्यापूर्वी ईडीने १७ ऑगस्ट २०२३ रोजी आर.एल. समूहातील फर्म्सवर छापेमारी केली होती. यात सोने-चांदीच्या दागिन्यांसह अनेक महत्वाची कागदपत्रे जप्त केली होती. यातून केलेल्या तपासातून अनेक बाबी संशयास्पद आढळून आल्या.यामुळे ईश्वरलाल शंकरलाल जैन व मनीष ईश्वरलाल जैन यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील खटल्यातच आता मनी लॉंड्रींगच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.