संस्कार’ हा शब्द दैनंदिन जीवनात सतत वापरात येणारी निव्वळ कृती नसून अव्याहत अनुभवाला योग्यतेची चुणूक दाखविणारा प्रत्यक्षदर्शी नमुना आहे. संस्कारांची परिभाषा आचरणातून सिद्धत्वास येते. भारतीय संस्कृती विविधतेतून एकतेचं, समृद्धीचं अस्तित्व असणारी जोपासणारी अथांग धारा आहे. बिकट परिस्थितीत निष्ठेनं, एकमेकांच्या संगतीनं आव्हान पेलण्याची ऊर्जा असलेली आपली भूमी आहे. जिच्या प्रत्येक कणात कष्टाचा, माणुसकीचा, आपलेपणाचा सुगंध आहे. भारतीय संस्कृतीमध्ये अद्वैताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या संस्कृतीनं आयुष्याची अनेक गणितं सोप्पी केली आहेत. दोन बाजूंचा समन्वय समसमान असेल तरच समीकरण सुटतं. गरज आणि पुष्टी यांचा तोल सांभाळला तर कठीण काहीच नाही. संस्कृती, परंपरा, चालीरीती यांना शाब्दिक महत्त्व नसून त्या प्रत्यक्षात जगायची दृष्टी आपणा भारतीयांमध्ये आहे. हल्ली मोठमोठे शब्द, वाक्यफेक सहजच बोलण्यांत बघायला मिळते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘सल्ला.’ हा शब्द तर असा आहे की, त्याला वयाची, पात्रतेची, स्थळाची अट नाही. कोणीही कोणाला कुठेही विनामूल्य उपदेश देऊन जातं.
बरं गमतीचा भाग असा की, श्रोतासुद्धा त्याची नीट शहानिशा करत नाही आणि सल्ला देणारा ब-याचदा निर्मळ अनुषंगाने व्यक्त होतो. यात महत्त्वाचं एकच असतं, समोरचा काय बोलला यापेक्षा आपण काय अर्थ काढतो, यावर ते निर्भर असतं. क्षणभंगुर मृगजळाचा पाठलाग आपल्याला पार थकवतो नि सरतेशेवटी निष्पन्न काहीही होत नाही. कोरोना काळात बाहेरून घरी आल्यावर हात धुवावे, पाय धुवावे आणि मग घरात संचार करायचा, हा नियम सर्वांनी पाळला; आत्ताही पाळतोच. आपले हे संस्कार आहेत; पण मग या अशाच छोट्या-छोट्या गोष्टी आपण करायचो का? पाश्चात्त्य संस्कृतीबद्दल मला बोलायचं नाही; मात्र आपल्याकडे अशा एक ना अनेक गोष्टी, ज्यांना आपण संस्कार म्हणतो, त्या खरंच पाळल्या जातात का? माझ्या मते आपल्याला त्याचा विसर पडतोय. सण-समारंभांचं चित्र पालटलंय, निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीचं भान विसरत चाललोय एकंदरीत ‘आत्मकेंद्री आयुष्य’ या संज्ञेपलीकडे जायचा विचारच कोणाला करायचा नाहीये. असल्या या जीवनशैलीत आनंद, समाधान यांना वावच नाही. सगळीकडे स्वार्थ शब्दाचा सर्वोच्च बिंदू गाठला की झालं!
सत्कृत्य आणि समंजसपणा निरोगी आयुष्याचं खाद्य आहे. ईर्ष्या, अहंपणा माणसातील निरागसता कधी गिळून भस्म करणार तो कळतही नाही. आपल्या बुद्धीचा, चातुर्याचा वापर इष्ट कार्यांसाठीच करावा. मध्यंतरी समाजमाध्यमावर एक पोस्ट वाचली. लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला लहान मुलांसाठी भेटवस्तू आणा व सकाळी त्यांना दिसल्यावर लक्ष्मीचा प्रसाद म्हणून त्यांच्याकडे ती सुपूर्द करा… वेगळी आणि छान कल्पना वाटली. आपण खूप भाग्यशाली आहोत. कारण आपल्याकडे खूप छान संस्कृती आहे. जी संस्कृती आपल्याला निखळ आनंद, निरोगी जीवन आणि समृद्ध विचार देते. त्याचा लाभ घेत, संकल्प करूया उत्सव आपलेपणाचा, समारंभ प्रत्येक मनाचा. आपण म्हणतो हल्ली कोणीच कोणाच्या मदतीला धावून जात नाही. यामागे एकच सबळ कारण आहे. इथे भाऊ-बहिणी एकमेकांच्या वा-याला उभे राहत नाहीत.थोडक्यात रक्ताची नाती, त्यांचा अर्थ, त्याचं महत्त्व कळत नाही. मग इतरांबद्दल बोलायलाच नको.
आदर ही शैक्षणिक संकल्पना नसून तो दुस-याचा केलेला सन्मान आहे. मोठ्यांचा आदर का करावा? ते वयाने, मानाने, अनुभवाने मोठे आहेत म्हणून? माझ्या मते नाही! त्यांनी अनुभवलेला एकही कठीण प्रसंग लहानांच्या वाट्यात नसावा या त्यांच्या कष्टांसाठी. कर्तृत्वाने, पैशाने अनेक माणसं मोठी असतात. तथापि, ज्यांनी खूप काही कमावूनही त्याचा अहंकार नसणारी, सर्वांना धरून चालणारी मंडळी मोठी असतात. आपल्या सद्गुणांचा फक्त आपल्याला नव्हे, तर समाजालादेखील उपयोग होतो. ‘फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार’ या अर्थपूर्ण ओळी आपल्यापेक्षा प्रत्येक लहानग्यांपर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे. जबाबदारीला ओझं न मानता कर्तव्य म्हणून पार पाडलं की, छान वाटतं. संस्कार देऊन शिकता येतं असं नाही; कृतीतूनदेखील ते आत्मसात होतं. संस्कृतीबद्दल नुसती चर्चा न करता जोपासण्याचा प्रयत्न