नवी दिल्ली : “दहशतवादाला सुरक्षित आश्रय देणार्या देशांना आता एकाकी पडावे लागणार आहे. कोणत्याही स्वरुपातील दहशतवादाचे समर्थन केले जाऊ शकत नाही आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने आता त्याचा पर्दाफाश केला पाहिजे,” असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘शांघाय सहकार्य संघटने’च्या (एससीओ) शिखर परिषदेस दिलेल्या संदेशात केले आहे.
कझाकिस्तानच्या अध्यक्षतेखाली अस्ताना येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींच्यावतीने परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी हा संदेश वाचला. पाकिस्तानला कठोर संदेश देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “इतर देशाच्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या तत्त्वांच्या विरोधात कोणतेही पाऊल न उचलण्याचे तत्व मान्य करावे लागेल.” यासोबतच पंतप्रधानांनी दहशतवादाशी मुकाबला करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले.
“दहशतवादावर अंकुश ठेवला नाही, तर तो प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी मोठा धोका ठरू शकतो,” यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. “सीमेपलीकडील दहशतवादाला निर्णायकपणे प्रत्युत्तर देण्याची गरज आहे आणि दहशतवादाला वित्तपुरवठा आणि भरतीचा जोरदार मुकाबला करणे आवश्यक आहे,” यावरही त्यांनी भर दिला.
दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक समुदायाकडून कृती करण्याचे आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “असे करत असताना नैसर्गिकरित्या दहशतवादाशी मुकाबला करण्यास प्राधान्य दिले पाहिजे, जे एससीओच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे. आपल्यापैकी अनेकांनी हे स्पष्ट केले पाहिजे की, जर त्यावर नियंत्रण ठेवले नाही, तर ते प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी एक मोठा धोका आहे,” असेही पंतप्रधानांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
पंतप्रधान रशिया आणि ऑस्ट्रिया दौर्यावर जाणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. ८ जुलै ते दि. १० जुलै दरम्यान रशिया आणि ऑस्ट्रिया दौर्यावर जाणार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून मॉस्को येथे आयोजित २२व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेत दोन्ही नेते सहभागी होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी दि. ९ जुलै ते दि. १० जुलै दरम्यान ऑस्ट्रिया येथे जाणार आहेत
गेल्या ४१ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच ऑस्ट्रियाभेट आहे. येथे पंतप्रधान ऑस्ट्रियाचे राष्ट्रपती अलेक्जेंडर वान डेर बेलन आणि चान्सलर कार्ल नेहमर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील. त्याचप्रमाणे, पंतप्रधान मोदी मॉस्को आणि व्हिएन्ना येथील भारतीय समुदायाशीदेखील संवाद साधणार आहेत.