घरटं

प्रमोद पिवटे 

मो.नं . ८३०८४९११४७

 

घरटं असतंच असं, जिथे नसतं माणिक मोती हिर्‍यांचं झुंबर, नसतो स्वार्थीपणाचा आव. तिथे आपलेपणाच्या नात्यापलीकडे दुसरे नातेच नसते. फक्त आणि फक्त मायेचा पाझर पाझरत असतो.

आपलेपणाच्या ओलाव्यातूून जिथे अहंभाव नसतो. कोणी लहान नसतो, कोणी मोठा नसतो. जिथे प्रत्येक घास भरवताना चोचल्यांचे स्वाद नसून, मायेचा गोडवा असतो. इवल्याशा चोचींना भरवण्याच्या नादात जिथे रानावनात भिरभिरतात पंख, आपलेपणाच्या पंखांना बळ येण्याच्या नादात. इवल्याशा पंखांना रंग भरण्यासाठी धडपडताना श्रमांनाही मग मोल येते जिथे. जिथे छप्परं नसतात आणि भिंतीचे बंधनंही नसतात आणि संकोचित नसतात बल विचारांच्या पगड्या. या निळ्या नभांगणात उडण्याचे सामर्थ्य आणि बल येण्यासाठी धडपडत असतात मायबाप जिथे गारा, वारा, पाऊस, ऊन्ह, झेलण्याचं सामर्थ्य येईपर्यंत प्रतीक्षेत असतात आपलेच आपलेपण मायेची ऊब घेऊन.

घरटे जे आपले जिथे असतात उमाळे फुलपाखरांचे. लतावेलींचे, इवल्या फुलांचे, फांदी फांदीवरून हळूच घरंगळणार्‍या पागोळ्यांचे, मंद सुगंधाचे. नसतात तिथे बंधनं जातीचे भाषेचे आणि किलबिल असते सारे आलबेल.

घरटं असतंच असं जिथे लवलेशही नसतो काही साठवण्याचं. पोटापुरतं तेवढंच असतं, चोचीत आणि चोच असतेच फक्त पोटासाठी. घरटं असतेच असं जिथे पंखांना बळ मिळालं की, आकाश पालथं घालण्यासाठी ते सारं मायेच्या श्रृंखला मोकळ्या करते.
घरटं असतंच असं जे मोहाच्या बंधनात न अडकवता क्षितीजाला गवसणी घालण्यासाठी या विश्वालाही विश्वालाही साद देते. घरटं असते हिंदोळ्यांचं, काडीकचर्‍यांचं, घरटं असते विरलेल्या वेदनेचं, आनंदाच्या सरीत कधीकाळी न्हालेलं. किलबिलणार्‍या रानात नव्याने संदर्भ अधोरेखीत करण्यासाठी डौलानं डहाळीवर झोके घेत असतं, पुन्हा पुन्हा नव्या नवलाईचं लेणं घेऊन जन्म घेत.

घरटं असतंच असं जिथे माणसंही भाळतात, बंगला सोडून घरट्यावर, विशेष घरट्याला नसते नाव, गाव, पाटी आणि घरट्यात नसतात माणसासारखे राव.

घरटं असते तिथे किलबील असते, झाडावर झाड आणि घरट्याला नसतोच कधी कर.
घरटं असतं मनासारखं तनामनात रुजलेलं, कधी होऊ आम्ही पाखरं…