तरुण भारत लाईव्ह । ११ एप्रिल २०२३। नवीन शैक्षणिक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण पुढील काळात मराठीत दिले जाणार आहे. शैक्षणिक धोरण पुढील काळात महत्त्वाचे ठरावे, यासाठी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. राज्य सरकारही याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून करणार असल्याचे केसरकर यांनी माध्यमांना सांगितले. नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून शिक्षण पद्धतीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत.
देशात शालेय शिक्षणाचे स्वरूप आतापर्यंत 10+2 असे होते. नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख नाही. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल.
असे असतील शैक्षणिक वर्षाचे टप्पे?
– पहिली पाच वर्षे : पूर्व प्राथमिकचे तीन वर्षे आणि इयत्ता पहिली ते दुसरी
– पुढील तीन वर्षे : इयत्ता तिसरी ते पाचवी
– त्यानंतरची तीन वर्षे : सहावी ते आठवी
– उर्वरित चार वर्षे : नववी ते बारावी
सेमिस्टर पॅटर्नवर भर
नव्या पॅटर्ननुसार बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व कमी होणार असून, (Education Policy( सेमिस्टर पॅटर्नमध्ये ही परीक्षा असणार आहे. सध्या बोर्डाची परीक्षा वर्षातून एकदाच होते. परंतु, यापुढे वर्षातून दोन वेळा सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे. म्हणजेच, नववीपासून बारावीपर्यंतचे शिक्षण आठ सेमिस्टर विभागण्यात आले आहे तसेच महाविद्यालयीन प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याचाही विचार आहे.