---Advertisement---
भुसावळ : वरणगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्था आणि वन्यजीव विभाग, नाशिक यांच्यातर्फे आयोजित पाचवे उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलन 27 व 28 डिसेंबर 2025 रोजी पाल (ता. रावेर) येथील दादासाहेब चौधरी वन प्रशिक्षण संस्थेत होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी धुळे येथील डॉ. विनोद भागवत यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
कोण आहेत डॉ. विनोद भागवत?
धुळे येथील डॉ. विनोद रामकृष्ण भागवत गेल्या 15 वर्षांपासून पक्षीनिरीक्षण, सर्वेक्षण आणि पक्षी-अभ्यास या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहेत. ते उत्तर महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे क्रियाशील संस्थापक सदस्य असून पक्षीसंवर्धनासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.
संमेलनातील पुरस्कारांची घोषणा
या संमेलनादरम्यान विधि प्रतिष्ठित पुरस्कारांनी मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यात डॉ. अनिल माळी पुरस्कृत ‘पक्षी जनजागृती पुरस्कार’ पुरस्कृत अश्विन लीलाचंद पाटील, अमळनेर, न्यू कॉन्झरवर पुरस्कृत ‘महिला पक्षी अभ्यासक पुरस्कार’ पुरस्कृत डॉ. चंचल शहा, जळगाव), डॉ. सुधाकर कुऱ्हाडे पुरस्कृत ‘युवा पक्षी मित्र पुरस्कार’ पुरस्कृत लक्ष्मीकांत (राहुल) सोनवणे, जळगाव या सर्व पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम 1551 आणि सन्मानपत्र असे आहे.
संमेलनाचे उद्घाटन व मान्यवरांची उपस्थिती
संमेलनाचे उद्घाटन जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, वनसंरक्षक नाशिक वन्यजीव विभाग कृष्णा भवर, उपवनसंरक्षक जमीर शेख, राम धोत्रे, वनप्रशिक्षण केंद्राचे संचालक हेमंत शेवाळे, दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता राजेश मोराळे हे मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
संपूर्ण महाराष्ट्रातून दोनशेपेक्षा अधिक पक्षीमित्र, अभ्यासक व संशोधक सहभागी होणार आहेत.
संमेलनाची मुख्य थीम व कार्यक्रम
या वषची संमेलन-थीम ही ‘पाणथळ अधिवास आणि पाणथळावरील पक्षी संरक्षण आणि संवर्धन’ अशी आहे. या विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान, मार्गदर्शन, स्लाइड शो आदी आकर्षक सत्रांचे आयोजन केले आहे. तसेच सहभागींसाठी जंगल सफारी, कॅम्प फायर, आदिवासी नृत्य, खानदेशी स्वादिष्ट भोजन अशा भरगच्च मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे, अशी माहिती संमेलन समन्वयक विलास महाजन आणि सचिव चौधरी यांनी दिली.









