---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यात लाचखोरी रोखण्यासाठी शासनस्तरावरून वेळोवेळी जनप्रबोधन जनजागृती मोहिमेसह सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. असे असूनही, लाचखोरीला आळा बसण्याऐवजी लाच घेण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते आहे. जळगाव जिल्ह्यात २०२४ मध्ये ३७ गुन्ह्यांमध्ये लाचखोरांनी एकसष्टी गाठली होती, तर यंदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या ४५ सापळ्यांत ७७ लाचखोरांना चतुर्भूज करीत सुवर्णमहोत्सवी आकडा पार केला आहे. यावरून जिल्ह्यात लाचखोर उदंड झाले असल्याचेच दिसून येत आहे.
जिल्ह्यात शाळा प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे, शेती दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्रे वा अन्य कोणतेही शासकिय कागदपत्रे सद्यस्थितीत ऑनलाईन उपलब्ध आहेत. असे असताना अनेकदा कामे लवकर होण्यासाठी संबंधीत विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून लाचेची मागणी केली जाते. या लाचखोरीत अथवा वरकमाई करणाऱ्यांमध्ये महसूल विभाग अव्वल स्थानी आहे. तसेच पोलीस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद विभाग दुसऱ्या तर अन्य विभाग उतरत्या क्रमांकावर आहे. यात देखील सर्वात जास्त वर्ग तीन आणि वर्ग एक दोन चे अधिकारी कर्मचारी अव्वल आहेत.
सर्वात जास्त वर्ग तीनचे ३५ अन् ३० खासगी लाचखोर
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार अशा लाचखोरांना आळा घालण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान तब्बल ४५ सापळे लावण्यात आले होते. यात वर्ग १ चे ३, वर्ग २ चे ६ तर वर्ग तीनचे तब्बल ३५ जणांसह ३० खासगी व्यक्ती अशा ७७लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चतूर्भुज करण्यात आले आहे.
गतवर्षीपेक्षा २०२५ मध्ये आठ कारवाया अधिक
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२४ मध्ये ३७ गुन्ह्यांमध्ये ६१ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. यंदा जानेवारी ते डिसेंबर २०२५ दरम्यान ४५ सापळे लावण्यात येवून ७८ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली त्यातील एका जणाला अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
यांनी केली कारवाई
नाशिक विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.









