Marathi Sahitya Sammelan 2025: मराठीची पंढरी दिल्ली दरबारी पोहचल्याने मराठी भाषकांमध्ये आनंद, चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माय मराठी ही अभिजात भाषा आहे; सरकार दरबारी शिक्कामोर्तब झाले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने खान्देशातील प्रकाशकांमध्ये चैतन्य आले आहे. त्यामुळे नवी दिल्ली येथे होत असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशातील बोलीभाषांचा प्रचार-प्रसार या उद्देशातून अथर्व पब्लिकेशन्सने ग्रंथदालन थाटले आहे. त्यात अहिराणी, गुजरबोली, तडवी बोली यांसह इतर भाषांच्या पुस्तकांना दिल्लीकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्त दिल्ली दरबारी आता ’अथर्व’कडून खान्देशातील बोलीभाषांचा जागर करण्यात येत आहे.
संमेलनस्थळी ग्रंथांची 110 दालने असून, त्यांत खान्देशातील एकमेव अथर्व पब्लिकेशन्सतर्फे ग्रंथदालन थाटण्यात आले आहे. या दालनात खान्देशातील बोलीभाषांसह विविध कथा-कादंबऱ्यांसह कवितासंग्रह व इतर सुमारे दोन हजार पुस्तकांची मांडणी करण्यात आली आहे.
खान्देशातील साहित्यिकांच्या पुस्तकांची रेलचेल
या संमेलनात खान्देशातील साहित्यिकांच्या पुस्तकांची रेलचेल होती. त्यात डॉ. रमेश सूर्यवंशी लिखित अहिराणी ओवी-कोश, अहिराणी ओवी गीतांचा चिकित्सक अभ्यास, खान्देशातील बोलीतील लोकसाहित्य, वनमाला पाटील यांचे अहिराणी भाषेतील श्रीमद्भगवद् गीता, प्रा. डॉ. छाया निकम लिखित अहिराणी बोली भाषेतील जात्यावरील ओवी एक अभ्यास, संपादित गुर्जर बोली भाषा साहित्य, मराठी लोकरंग भूमी, अशोक कोळी लिखित तावडी बोली, डॉ. अरविंद नारखेडे लिखित लेवा गणबोली एक वास्तव (बहिणाईंची काव्यबोली), डॉ. सू. अजमेरा लिखित जागतिकीकरण आणि मराठी भाषा, शकुंतला पाटील-रोटवदकर लिखित खानदेशातील लोकोत्सव कानबाई, गौराई, डॉ. पुष्पा गावित लिखित आदिवासी संस्कृती : भाषा आणि साहित्य, डॉ. व्ही. एन पाटील लिखित धनगरी बोली : सामाजिक, भाषावैज्ञानिक विश्लेषण, वर्षा परगट लिखित व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित रामायण डेव्हलप युवर लाइफ स्किल्स यांसह अहिराणीत सुखदेव वाघ यांनी अनुवादित केलेली पहिली कादंबरी ’अमिना’, गुजरबोली, तावडी बोली, आदिवासी बोली आदी खान्देशातील बोलीभाषांसह राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम, तसेच आदिवासी संस्कृतीसह अन्य साहित्यावर सुमारे दोन हजार पुस्तकांचा समावेश आहे. अथर्वच्या ग्रंथदालनास 98 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी शनिवारी भेट दिली. दिल्लीकरांची मराठी व अहिराणीच्या पुस्तकांना असलेली पसंती पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला.
मराठीला अभिजात भाषेला दर्जा मिळण्यासाठी अनेक वर्षांपासून मराठी साहित्यिक, भाषा अभ्यासक, प्रकाशकांनी मागणी लावून धरली होती. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात लक्षणीय रोजगाराच्या संधी निर्माण होतील. डिजिटायझेशन संग्रहण, भाषांतर, डिजिटल मीडिया यांसारख्या क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण होतील. अहिराणी भाषेला राजमान्यता मिळावी, असा हेतू ठेवून खान्देशातील साहित्यिक, लेखकांनी काम करावे, अहिराणी भाषेत लिखाण वाढावे, त्याचा प्रचार-प्रसार व्हावा तसेच अहिराणीत अनेक अशा बाबी आहेत, त्या फक्त तोंडी आहेत. त्या परंपरागत बाबी लिखित व्हाव्यात, यासाठी प्रयत्नशील आहे, असे युवराज माळी (संचालक, अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव; राज्य कार्यकारिणी सदस्य, अखिल भारतीय मराठी प्रकाशक महासंघ) यांनी सांगितले.
अहिराणी भाषेचा गोडवा दिल्लीपर्यंत : स्मिता वाघ
खान्देशातील अहिराणीचा गोडवा अथर्व पब्लिकेशन्सच्या संमेलनातील ग्रंथदालनाच्या माध्यमातून दिल्लीदरबारी पोहोचल्याचा आनंद आहे. यासोबत बहिणाबाई चौधरी यांचे नाव संमेलनाच्या मुख्य सभामंडपाला दिल्याने ही अभिमानास्पद बाब असून, तो मोठा सन्मान आहे. अहिराणी ही आमची मातृभाषा आहे. अहिराणी भाषेतील साहित्य दिल्लीत पोहोचले, याचा वेगळाच आनंद आहे, असे खासदार स्मिता वाघ यांनी अथर्व पब्लिकेशन्सच्या ग्रंथदालनास भेटीप्रसंगी सांगितले.