संभाजी नगर : अनेक योजना आणि धोरणांच्या घोषणा, महिला-मुलींच्या सुरक्षेवर वारंवार होणारी चर्चा आणि प्रत्यक्ष स्थिती यात प्रचंड तफावत आहे. फक्त चार वर्षांच्या चिमुरडीवर एका मध्यमवयीन माणसाने अत्याचार केल्याची दुर्दैवी आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. औरंगाबाद च्या वाळूज भागातील ही घटना आहे. मंदिरातून घराकडे निघालेल्या या बालिकेवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर, पोलिसांनी आरोपीला तासाभरात जेरबंद केले.बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दैठण गावचा रहिवासी आहे.
वाळूज जवळ पंढरपूर येथे गुरुवारी रात्रीच्या सुमरास ही घटना घडली. पीडित चिमुकलीचे घर पंढरपूर इथे एका मंदिराच्या पाठीमागेच आहे. या मंदिरात रोज सायंकाळी सात वाजता हरिपाठ होतो.नेहमीप्रमाणे चिमुकली मंदिरात गेली आणि हरिपाठ सुरू झाला. चिमुकलीसोबत तिची बहीण होती पण तिची आई मात्र घरीच होती. मंदिरात मस्ती-गोंधळ करीत असल्याने बहिणीने तिला घरी पाठवून दिले. ती एकटीच मंदिरातून घरी यायला निघाली आणि त्याच सुमारास आरोपी कंपनीतून परतत होता. अंधाराचा फायदा घेत त्याने चिमुकलीचे अपहरण केले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपी संभाजी धवारे एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 11 च्या दरम्यान आरोपीने बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केला.
चिमुकली वेदना होत असल्याने आईने तिची विचारपूस केल्यावर हा घाणेरडा आणि संतापजनक प्रकार समोर आला. त्यानंतर पालकांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीच्या शोधासाठी तातडीने पथक स्थापन केले. रात्रीच मुलीच्या पालकांना सोबत घेत परिसर पिंजून काढला. आरोपीच्या वर्णनावरुन शोध घेतला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या.