जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला आपली ताकद दाखवली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष आपले पाय घट्ट करत आहे. यात शिवसेना उबाठा गट, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला सोडून गेलेलं नेते व कार्यकर्ते घर वापसी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याच धर्तीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक कार्यकारिणीतील युवक विधानसभा क्षेत्र प्रमुखांसह तब्बल 20 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.
आज खासदार सुप्रिया सुळे ह्या महिला मेळावा घेण्यासाठी जळगावात आल्या होत्या. यावेळी खासदार सुळे यांच्या हस्ते अजित पवार गटातील युवक कार्यकारिणीतील 20 जणांनी शरद पवार गटात प्रवेश केला. मंत्री अनिल पाटील हे कार्यकर्त्यांना वेळ देत नसून कार्यकर्त्यांची कुठलीही कामे करत नसल्याने नाराजी व्यक्त करत या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घर वापसी केली आहे.
यात अजित पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष साहील पटेल, युवक शहर जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख युवक रफिक पटेल, युवक उपाध्यक्ष अमर येवले यांच्यासह 20 जणांनी अजितदादांना सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला.
दरम्यान, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर युवक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार गटात गेलेले सर्व युवक पदाधिकारी 9 महिन्यानंतर पुन्हा शरद पवार गटात परतले आहेत. एक निष्ठावंत राहून सुद्धा कुठल्याही पदाधिकारी व कार्यकत्याच्या समस्या आपल्या पक्षाचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी सोडविल्या नाही.
याच कारणामुळे अजित पवार गटातील पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केला असल्याचे युवक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.