धुळे : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी प्रशासनाकडून निवडणूक पूर्व तयारी सुरु करण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाकडील अधिसूचनेनुसार सन 2024 मध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत काढण्यात येईल. यात शिरपूर तालुक्यातील काही गावांचे सरपंच पद हे महिलांसाठी आरक्षित असणार आहे. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आरक्षण सोडत काढण्यात आली.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदांचे 50% आरक्षण महिला आरक्षणाच्या अंतर्गत निश्चित करण्यात येणार आहे. या आरक्षण सोडतीसाठी 24 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात सोडत काढली जाईल. या संदर्भात माहिती देताना तहसिलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, शिरपूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासप्रवर्ग आणि महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
आरक्षण सोडतीसाठी शिरपूर तालुक्यातील भोरटेक, आढे, जैतपूर, पिंप्री, सावेर-गोदी, पिळोदा, जापोरा, वनावल, रुदावली, सुभाषनगर, अजंदे खु., नवे भामपूर, तऱ्हाडी त.त., अहिल्यापूर, टेंभे बु., भरवाडे, चांदपूरी यासारख्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासाठी तालुक्यातील सर्व आजी व माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, राजकीय पक्ष प्रमुख, ग्रामस्थ यांनी जिल्हा नियोजन सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.