---Advertisement---
नवी दिल्ली : भारतीय लष्कराला दोन हजार प्रहार लाईट मशीन गनची पहिली खेप अधिकृतपणे सोपवण्यात आली. ग्वाल्हेरच्या स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्समध्ये तयार करण्यात आलेल्या ७.६२ मिमी कॅलिबरचे शस्त्र एका मिनिटाला ७०० गोळ्यांचा वर्षाव करू शकते. याची मारक क्षमता ही हजार मीटर (१ किमी) अंतरापर्यंत अचूक निशाणा साधण्याची आहे. सीमेवरील मारक क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने प्रहार लाइट मशीन गन अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात, भारतीय सैन्याला दोन हजार प्रहार लाइट मशीन गनची पहिली खेप सुपूर्द करण्यात आली. ही मशीन गन एका मिनिटाला ७०० गोळ्यांचा वर्षाव करू शकते. या शस्त्रात एक किमी अंतरापर्यंत अचूक निशाणा साधण्याची क्षमता आहे. केवळ आठ किलो वजनाच्या या मशीन गनची लांबी ११०० मिमी आहे. यामुळे ती वाहून नेण्यास अत्यंत सोपी आहे.
या आधुनिक शस्त्रांचा वापर प्रामुख्याने भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमांवर केला जाणार आहे. दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये गस्त घालणाऱ्या जवानांसाठी ही मशीन गन अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास संरक्षण विभागाने जारी केलेल्या निवेदनातून व्यक्त करण्यात आला.
लष्करी क्षेत्रातील आत्मनिर्भरता
कार्यक्रमाला संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव ए. अंबरासु आणि अडाणी डिफेन्स ॲण्ड एयरोस्पेसचे सीईओ आशिष राजवंशी उपस्थित होते. भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. खासगी क्षेत्रातील सहभागामुळे भारतीय सैन्याला जागतिक दर्जाची शस्त्रे आता देशातच उपलब्ध होत असल्याचे अंबरासू आपल्या संबोधनात म्हणाले.








