केंद्र सरकारचा १०० दिवसांच्या अजेंड्यावर ; पंतप्रधान सचिवांसोबत बैठक घेणार!

नवी दिल्ली : १८ व्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्थसंकल्पानंतर आगामी १०० दिवसांच्या अजेंड्यावर सचिवांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत १०० दिवसांच्या अजेंड्यावर चर्चा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष २०२५ करिता केंद्रीय अर्थसंकल्प दि. २३ जुलै रोजी सादर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विशेष अधिवेशनानंतर पंतप्रधान मोदी दि. ०८ ते १० जुलै या कालावधीत रशिया दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यानंतर आर्थिक वर्ष २०२५ करिता केंद्रीय अर्थसंकल्प दि. २३ जुलै रोजी सादर होण्याची शक्यता आहे. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्येक मंत्रालयाने बजेटचे प्रस्ताव पाठवले असून आगामी १०० दिवसांचा अजेंडाही निश्चित करण्यात आला आहे.

अर्थसंकल्प सादर करण्याआधी दि. २२ जुलै रोजी आर्थिक आढावा मांडला जाणार आहे. यासंबंधीचे सादरीकरण अर्थसंकल्पानंतर पंतप्रधानांसमोर केले जाईल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सामाजिक क्षेत्रातील योजनांना चालना देण्याच्या दृष्टिकोनातून १०० दिवसांचा अजेंडा अत्यंत महत्त्वाचा असेल.

बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय १०० दिवसांच्या कार्यसूचीचा भाग म्हणून प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) अंतर्गत दीड लाख महिलांना प्रशिक्षण देईल. या कालावधीत दळणवळण मंत्रालय स्पेक्ट्रम वाटपाबाबत विभागीय नियम लागू करण्याची शक्यता आहे.