MLA Kishore Patil : पाचोऱ्यातील अतिक्रमित घरे मोजणी प्रक्रियेला उद्यापासून होणार सुरुवात

#image_title

पाचोरा : आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या सूचनेनुसार नगर परिषद प्रशासनाने पाचोरा शहरातील शासकीय जागेवरील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नियमानुसार नावावर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत शुक्रवारी सकाळी १० वाजता शहरातील जनता वसाहत भागातील धम्मोदय बौद्ध विहार परिसरापासून मोजणीला सुरुवात होणार आहे.

प्रशासनाने पाचोरा शहराला काही टप्प्यांमध्ये विभागले असून, पहिल्या टप्प्यात सुमारे २५० घरांची मोजणी केली जाणार आहे. यामुळे वर्षानुवर्षे घरांच्या अधिकृत नोंदणीची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

२०११ पूर्वीच्या अतिक्रमण धारकांना मिळणार अधिकृत नोंदणी

राज्य शासनाच्या धोरणानुसार २०११ पूर्वीच्या सरकारी जमिनीवरील रहिवासी क्षेत्रातील घरे अतिक्रमण नियमानुसार अधिकृत करण्याची योजना आहे. मात्र, अद्याप कार्यवाही होत नसल्याने नागरिकांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडे निवेदन दिले होते. त्यांच्या मागणीची दखल घेत आ. किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा व भडगाव शहरातील सर्व शासकीय जागेवरील अतिक्रमित घरांना अधिकृत करण्यासाठी तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले.

याच पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने मोजणी शुल्क भरून मोजणी प्रक्रियेची सुरुवात केली आहे. पाचोरा व भडगाव शहरांमध्ये मिळून सुमारे ७,००० अतिक्रमित घरे असून, त्या सर्वांची टप्प्याटप्प्याने अधिकृत नोंदणी केली जाणार आहे.

प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती

मोजणी प्रक्रियेसाठी मुख्याधिकारी मंगेश चव्हाण, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक एम. व्ही. तोटावार, शहर अभियंता भय्यासाहेब पाटील, उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे, दुर्गेश सोनवणे, नगररचना विभागाचे धीरज नेटके यांच्यासह भूमी अभिलेख आणि नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.

मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी अतिक्रमित मालमत्ता धारकांनी मोजणी प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून प्रक्रिया सुचारू आणि वेळेत पूर्ण करता येईल.

आ. किशोर आप्पा पाटील यांचे प्रतिपादन

“विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दिशेने आम्ही पाऊल टाकले आहे. पाचोरा व भडगाव शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमित घरे अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याचा लाभ सुमारे ७,००० कुटुंबांना मिळेल, आणि त्यामुळे गरिबांना हक्काचा निवारा मिळणार आहे. गरजू जनतेसाठी काम करण्याचे समाधान लाभत आहे.”

– आ. किशोर आप्पा पाटील, आमदार पाचोरा-भडगाव