---Advertisement---

Sangita Patil : उद्योगमंत्र्यांचे महाराष्ट्र चेंबरच्या जळगाव विकास परिषदेतील दिलेले आश्वासन पूर्णत्वाकडे!

---Advertisement---

मुंबई : जळगाव जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) सातत्याने शासनस्तरावर पाठपुरावा करत आहे. याच पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारी २०२३ रोजी MACCIA अध्यक्ष श्री. ललित गांधी यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्हा विकास परिषद घेण्यात आली होती. या बैठकीनंतरही महाराष्ट्र चेंबरने शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.

या प्रयत्नांना यश येत जळगाव जिल्ह्यात नवीन एमआयडीसी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामध्ये आयटी उद्योगासाठी २०० एकर जागा राखीव ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. या निर्णयाचे महाराष्ट्र चेंबरच्या उपाध्यक्ष संगिता पाटील यांनी स्वागत केले असून, जळगाव विकास परिषदेत दिलेले आश्वासन पूर्णत्वास जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री आणि अॅग्रीकल्चरच्या शिष्टमंडळाने आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. या वेळी चेंबरच्या उपाध्यक्ष संगिता पाटील, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य किरण बच्छाव, महेंद्र रायसोनी, अरविंद दहाड, अश्विन परदेशी, तसेच जळगाव एमआयडीसीचे अधिकारी सुनील घाटे, श्री. पाटील, उद्योग भारतीचे अध्यक्ष प्रमोद संचेती, रवी फालक, संतोष इंगळे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला.

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी घेण्यात आलेले निर्णय
सध्या महापालिका आणि एमआयडीसीकडून वेगवेगळे कर आकारले जात आहेत. यासंदर्भात शासन पातळीवर एकत्रित कर लागू करण्याबाबत विचार सुरू असून, तोपर्यंत उद्योजकांवर सक्तीने कर वसूल करू नये किंवा कंपन्यांवर सील करण्याची कारवाई करू नये, असे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात आले.

आरडीएसएस योजनेअंतर्गत नवीन सबस्टेशन प्रस्तावित असून, चार प्लॉट आवश्यक आहेत. यातील दोन प्लॉट तातडीने उपलब्ध करून देण्यात आले असून, उर्वरित दोन प्लॉटसाठी प्रक्रिया सुरू आहे.

एमआयडीसीमध्ये प्रलंबित असलेला फायर स्टेशनचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून, एमआयडीसी स्वतः हे फायर स्टेशन चालवणार आहे.

ईएसआयसी या हॉस्पिटलसाठी दिलेल्या जागेवर उच्चदाब वीज वाहिनी असल्याने अडथळा निर्माण झाला होता. ही वाहिनी हलवण्यासाठी डीपीडीसीतून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

एमआयडीसीमधील रस्ते दुरुस्त करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच कामगारांसाठी ई-बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

कामगारांसाठी घरे उपलब्ध करून देण्याच्या दिल्या सूचना

जळगावमध्ये चटई क्लस्टर उभारण्यासाठी एक एकर जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला आहे. तसेच जळगाव शहरात उभारल्या जाणाऱ्या उद्योग भवनाचे काम संथ गतीने सुरू असल्याने ठेकेदार बदलण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला.चाळीसगाव आणि भुसावळसह इतर तालुक्यातील एमआयडीसीच्या रस्त्यांचे प्रश्नही चर्चेत आले. या निर्णयांमुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींना गती मिळणार आहे.

महिला उद्योजकांसाठी सुवर्णसंधी

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जळगावच्या औद्योगिक क्षेत्रात महिलांसाठी काही जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे महिला उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष सवलती आणि सुविधा मिळणार असून, उद्योग क्षेत्रात महिलांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. जळगाव जिल्ह्यातील महिला उद्योजकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संगिता पाटील यांनी केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment