धर्मांचा धर्म जो शाश्वत आहे तो ‘सनातन हिंदू धर्म’ : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

पुणे :  हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे, असे गौरवोद्‌गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी काढले.

हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या मैदानात हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ डिसेंबरपर्यंत हा महोत्सव सुरू आहे. यात हिंदू संस्कृती, संस्कार आणि सामाजिक सेवाकार्याची माहिती सादर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अनेक देवस्थाने, सामाजिक, धार्मिक संस्था, मठ मंदिरांच्या सेवाकार्याचा त्यात सहभाग आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अॅड. एस. के जैन, उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, हिंदू सेवा महोत्सवाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, स्वामी गोविंददेवगिरी महाराज, लाभेश मुनीजी महाराज, इस्कॉनचे गौरांग प्रभू, हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी आदी मान्यवर उपस्थित होते.

सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले की, सेवा करताना कायम प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा आपला स्वभाव असतो. दिखाव्यासाठी सेवा न करता ती निरंतर करीत राहणारे सेवेची कामना करतात. सेवेचा धर्म सांभाळताना अतिवादी न होता त्याचा मध्यम मार्ग आपण देशकाल परिस्थितीनुसार स्वीकारायला हवा. मानव धर्म हाच विश्वाचा धर्म असून, तो सेवेतून प्रकट व्हावा. आपण विश्वशांतीसाठी घोषणा देतो. मात्र, अल्पसंख्यकांची काय अवस्था इतरत्र आहे, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तीन हजार वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेले शास्त्र, वाचन, इतिहास, स्वभाव आपले आहे. ते पाहणे आणि अंगीकारणे, पुढील पिढ्यांना त्यातून प्रेरणा देणे यासाठी असे हिंदू सेवा महोत्सवासारखे उपक्रम आहेत.

पोट भरण्यासाठी आवश्यक ते केलेच पाहिजे, पण गृहस्थाश्रमापलीकडे आपण जे जे मिळाले आहे, ते सेवा रूपाने दुप्पट द्यायला हवे. जग आपले प्रतिपालक आहे. उपभोगाची वस्तू नाही, ही भावना असेल तर परिवार, समाज, गाव, देश, राष्ट्र यांची मुक्त सेवा करण्याची प्रेरणा आणि अनुकरण आपण करावे. यासाठी अशा महोत्सवातून सेवाव्रत घेऊन चालूया, असा संदेशही त्यांनी दिला.