धरणगाव : तालुक्यातील रेल येथे गुरुवारी, २९ रोजी रात्री एका घरावर दरोडा पडला. यात ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली. तिच्या कानातील सोन्याचे किल्लू निघत नसल्याने दरोडेखोरांनी अखेर महिलेचा कान कापून नेला. कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्यासह रोख रक्कम दरोडेखोरांनी चोरुन नेले. या प्रकरणी धरणगाव पोलिसात (पाळधी दूरक्षेत्र) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, रेल गावातील विमलबाई श्रीराम पाटील (वय ७०) या गुरुवारी, २९ रोजी रात्री मंगल नथ्थू पाटील यांच्या घराच्या वरील पत्री शेडमध्ये एकट्या झोपलेल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे, साधारण २५ हजार रुपये किमतीच्या सोनसाखळ्या (किल्लू) कान कापून तसेच डोक्यावर व तोंडावर दुखापत करून चोरुन नेले. सकाळचे नऊ वाजले तरी आजी खाली आल्या नाहीत म्हणून शेजारची महिला वर बघायला गेल्या. तेव्हा आजी रक्तबंबाळ अवस्थेत पडून होत्या.
घटनेची माहिती मिळताच वृद्ध महिलेचा नातू नीलेश मच्छिंद्र पाटील (रा. पिंप्री, ता. धरणगाव) घटनास्थळी पोहचले. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आजीजवळ साधारण ५० हजारांची रोकड असल्याचे देखील नीलेश पाटील यांनी सांगितले.
घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चोपडा विभागीय अधिकारी ऋषिकेश रावले, अमळनेर विभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, अमोल गुंजाळ यांनी भेट दिली. या प्रकरणी पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.