तरुण भारत लाईव्ह न्यूज । ५ डिसेंबर २०२२ । दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले पाच आरोपी लॉकअपच्या खिडक्या तोडून फरार झाल्याची घटना नवापुरात घडली आहे. दरम्यान, एकास गुजरात पोलीसांनी पकडले आहे. घटनेच्या पार्श्वभुमीवर दोन्ही राज्याच्या सिमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर पोलीसांत एका दरोड्याच्या गुन्ह्यात पाच जणांना आज दि.५ डिसेंबर २०२२ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अटक करुन पुरुष लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र लॉकअपच्या मागच्या भिंतीला असलेली खिडकी तोडून आरोपी फरार झालेे. नवापूर पोलीस ठाण्याची लॉकअप असलेली इमारत ब्रिटिश कालीन व जुनाट आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांची वर्दळ असताना आरोपी पलायन करण्यात यशस्वी कसे काय होऊ शकले? हा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.
दरम्यान यापैकी एकास व्यारा येथील पोलीसांनी पकडले असून उच्छल पोलीस ठाण्यात आणण्यात आले. या घटनेच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र, गुजरात पोलीसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.