अमळनेर : येथील एका सलून दुकानदाराचा रस्ता अडवून त्यास फायटरने मारहाण करण्यात आली. त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन व खिशातील 5 हजार 600 रोख रक्कम काढून घेत त्याच्या मोटरसायकलचे नुकसानही केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर येथील झामी चौक या ठिकाणी मनोज बबन ठाकरे हा वास्तव्यास आहे. व्यवसाय म्हणून तो सलूनचे दुकान चालवितो. सोमवार, 1 जुलैच्या रात्री अकरा वाजता दुचाकीने घरी जात असताना शहरातील कासली भागात काही लोकांनी त्याचा रस्ता अडविला. त्याला शिवीगाळ करून फायटरने काठीने बेदम मारहाण केली. त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन खिशातील 5 हजार 600 रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. याप्रकरणी मनोज ठाकरे याने अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मंगळवार, २ जुलै रोजी पहाटे ३ वाजता वसीम खान, कालीम उर्फ कालू रिक्षावाला, बाबा शहा, तन्वीर शहा, एजाज पठाण, अस्लम पठाण यांच्यासह इतर १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहे.