शिक्षक मिळावे या मागणीसाठी सरपंचाने शाळेला ठोकले कुलूप ; पंचायत समितीत भरवली शाळा

रावेर : रावेर तालुक्यातील थेरोळा जिल्हा परिषद शाळेत शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत होता. या संदर्भात वारंवार शिक्षकांची मागणी करूनही रावेर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला जाग येत नसल्याने थेरोळे सरपंच शुभम पाटील यांनी विद्यार्थ्यांची शाळा पंचायत समिती भरवत लाक्षणिक उपोषण मंगळवारी केल्यानंतर शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली.

शिक्षक मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन
रावेर तालुक्यातील थेरोळे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. साधारणतः ६९ इतकी विद्यार्थी संख्या आहे. मात्र, शिकवण्यासाठी केवळ दोन शिक्षक आहेत. या वर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आवश्यक शिक्षक देण्यात यावे व रिक्त जागा भरून विद्यार्थी हितासाठी व त्यांच्या उज्वल व उत्तम शिक्षणासाठी शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी अगोदर अनेकवेळा तोंडी व लेखी पत्राद्वारे पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांना विनंती करण्यात आली. मात्र कुठलाही प्रतिसाद अद्यापपर्यंत मिळाला नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उज्वल भविष्यासाठी व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता पंचायत समितीबाहेर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा निर्णय शुभम पाटील यांनी घेत आंदोलन केले.

आश्वासनानंतर आंदोलन मागे
संबंधित विभाग शिक्षक उपलब्ध करून देत नसल्याने सरपंच शुभम पाटील यांनी थेरोळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला कुलूप लावले. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन थेट रावेर पंचायत समितीत धाव घेतली. रावेर पंचायत समितीच्या आवारात मुख्य दरवाज्याजवळ थेराळे येथील विद्यार्थ्यांची शाळा भरवून सरपंच शुभम पाटील यांनी लाक्षणिक उपोषण केले. १० सप्टेंबरपर्यंत शाळेला शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन संबंधितांकडून मिळाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.