तरुण भारत लाईव्ह । २३ जानेवारी २०२३। महापालिकेत गत निवडणूकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ आता मोजकाच शिल्लक आहे. विकास कामे नाही, जनतेतून रस्त्यांसाठी व्यक्त होणारा संताप व राजकीय अस्थिरता यामुळे सत्तेच्या अपेक्षेने गट बदलविणार्या नगरसेवकांसह अन्य नगरसेवक सैरभैर झाले असून काही जण आपण सुरक्षीत कोणत्या पक्षात राहू याचाच खटाटोप करताना दिसत आहेत.
75 प्रभागांसाठी मनपाची 2018 मध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत गेल्या अनेक वर्षासून वर्चस्व असलेल्या माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या समर्थक शिवसेना गटाला धक्का बसला. मंत्री गिरीश महाजन यांनी महापालिकेत तब्बल 57 नगरसेवक निवडून आणले. या काळात महापौर म्हणून आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे या नगरसेवक होत्या. यावरून प्रारंभी काहीशी कुरबुर झाली मात्र नंतर सर्व सुरळीत झाले. कालांतराने राज्यात सत्तांतर झाले. आणि महापालिकेत पडझड सुरू झाली. विद्यमान महापौर कुलभुषण पाटील यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. भाजपत त्यांनी उभी फुट पाडत 27 नगरसेवक शिवसेनेच्या गोटात नेले. आणि सत्तांतराच्या हालचाली सुरू झाल्या. राज्यात तत्कालीन शिवसेना आघाडी सरकार होते. या गटाने शिवसेनेत उडी घेतली. महापौर निवडीत शिवसेनेचे सुनील महाजन यांच्या पत्नी जयश्री महाजन या महापौर झाल्या. भाजपकडे अवघे 57 पैकी 28 एवढेच संख्याबळ होते.
200 कोटींची किमया
जळगाव शहरातील विकास कामे करण्यात सत्ताधारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट अपयशी ठरत आहे. एकीकडे निधी शिल्लक असताना अनेक कामांचा खोळंबा झाल्याची परिस्थिती आहे. कामांमधील घोळ,घोटाळे यामुळे शासनाने मनपातील कामे सार्वजनिक बांधकाम विमागाला दिली आहेत.रस्त्यांचे तीन-तेरा झाले पण लक्ष देण्यास कोणी तयार नाही. यामुळे प्रभागांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यातच शासनाने जळगाव शहराच्या विकासासाठी 200 कोटींचा निधी जाहीर केल्याने किमान यातून कामे होतील, अशी आशा नगरसेवकांना आहे. कारण कामेच होत नसल्याने अनेकांनी वॉर्डात फिरणेही बंद केले आहे. अगदी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होत असल्याने काही जण भाजप तर काही जण बाळासाहेबांची शिवसेना या गटात स्थान मिळावे असाच खटाटोप करत असल्यामुळे भविष्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट अल्पमतात दिसला तरी याचे कुणाला आश्चर्य वाटणार नाही. बहुतांश नगरसेवक सैरभैर झाले असून सोयीचे ‘घरटे’ कोणते याचाच शोध घेत असल्याचे दिसून येत
राज्यात सत्तांतर…
काही काळ संसार सुखाचा झाला आणि राज्यात पुन्हा सत्तांतर झाले. शिवसेनेतील एक मोठा गट भाजप सोबत आला. आता राज्यात बाळसाहेबांची शिवसेना व भाजप अशी युती आहे. महापालिकेत मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची सत्ता आहे. सद्यस्थितीत या गटाकडे सत्ता असली तरी पूर्णत:कोंडी झाल्यागत परिस्थिती येथे आहे. त्यांच्या समर्थक नगरसेवकांची चलबिचल सुरू आहे. काही नगरसेवकांनी नुकतीत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या पक्षात पालकमंत्र्यांच्या साक्षीने प्रवेश केला. तर भाजपातून बाहेर पडलेल्या नगरसेवकांमधील काही जण पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत.