धुळे : वडिलांनी कामावरुन टोमणे मारल्याने एकूलत्याएक मुलाने वडिलांच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची दुर्दैवी घटना साक्री तालुक्यातील खारगाव येथे घडली. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस तपास करीत आहेत.
बापू पांड्या कुवर, (५३ ) यांनी आपला मुलगा विजय कुवर (२५) यास ‘घरात बसण्याऐवजी काही कामधंदा कर’, असे सांगितले. याचा राग येऊन विजयने वडिलांच्या डोक्यात दगड टाकून निर्घुणपणे खून केला. वडिलांची हत्या करून विजयने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पुढील तपास सुरू केलाय. त्याचबरोबर खुनी मुलाच्या तपासासाठी शोधपथक देखील सज्ज ठेवण्यात आले आहेत. लवकरात लवकर मारेकरी मुलाचा शोध लावून त्याच्या मुसक्या आवळण्यात येतील, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांतर्फे व्यक्त करण्यात आलाय.
अशी घडली घटना
बापू पांड्या कुवर, हे शेती काम करत होते. तेथे विजय देखील उपस्थित होता. यानंतर बापू कुवर हे जेवण करत असताना ‘घरात बसण्याऐवजी काही कामधंदा कर’ वडिलांच्या असे विजयला सांगितले. वडिलांच्या अशा बोलण्याने विजयचा राग आला. यामुळे विजय याने रागात वडिलांच्या डोक्यात थेट दगडच टाकून वडिलांची हत्या केली. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात वडिलांना तसंच सोडून त्याने घटनास्थळावरून पोबारा केला.
या घटनेची माहिती मिळाताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पहाणी करून बापू कुवर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपळनेर रुग्णालयात पाठवल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, मुलगा विजय कुवर हा चिडखोर स्वभावाचा असून त्याच्या डोक्यावर परिणाम झाला असल्याचं सांगण्यात येतंय. घटनेनंतर तो पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. एकुलल्या एक मुलाने वडिलांचा खून केल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.