फटाक्यांच्या आवाजामुळे पशुधनांसह सापांच्या स्वभावावरच झाला परिणाम

#image_title

फटाक्यांच्या आवाजामुळे पशुधनासंह सापांच्या स्वभावावर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या दिवसांत वन्यजीव संरक्षक संस्थेच्या सदस्यांनी शहराच्या विविध भागातून धामण प्रजातीच्या आठ सापांना रेस्क्यू करून त्यांना जंगलात सोडले.

दिवाळीच्या काळात विविध प्रकारच्या फटाक्यांच्या आतषबाजीचा होणारा कर्णकर्कश आवाज, तर कंपन करणारे बॉम्ब फोडल्याने जमिनीला हादरे बसतात. याचा विपरीत परिणाम गायी, म्हशी, बैल, शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, मांजरी या प्राण्यांवर होतो. या आवाजामुळे ते बिथरून सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न करतात. फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळेही त्यांच्या श्वसनप्रक्रियेवर परिणाम झाला आहे. यासोबतच त्यांच्या स्वभावातही चिडचिडेपणा आला आहे.

पक्ष्यांवरही परिणाम

फटाक्यांचे आवाज आणि त्यातून निघणाऱ्या धुरामुळे झाडांवर, घरांच्या गॅलरीत व इतर ठिकाणी रात्रीच्या आश्रयाला आलेल्या पक्ष्यांवरही झाल्याचे वन्यजीव संरक्षक संस्थेच्या सदस्यांना आढळून आले आहे. यामुळे अनेक पक्षी आश्रयस्थाने सोडून दुसरीकडे निघून गेले आहेत, तर धुरामुळे लहान पिल्लेही मृत झाली आहेत.

साप आले वर

जमिनीतील सुरक्षित जागी दडून बसणाऱ्या विविध प्रजातीच्या विषारी व बिनविषारी सापही फटाक्यांच्या कंपनामुळे मूळ जागा सोडून दुसरीकडे जाण्यासाठी सैरावैरा पळत सुटले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी साप जमिनीच्या वर आल्याने नागरिकांची धावपळ उडाली.

आठ धामण सापांना सोडले अधिवासात

दिवाळीच्या दिवसांत अनेक साप जीव वाचविण्यासाठी मूळ जागा सोडून बाहेर आले होते. अशा आठ धामण जातीच्या सापांना वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. यासाठी संस्थेचे जगदीश बैरागी, राजेश सोनवणे, रवींद्र भोई, वात्सल्य नेचर क्लबचे किशोर पाटील, राज पाटील, पंकज सूर्यवंशी, अमोल बारी यांनी रेस्कु करून त्यांना निसर्गात सोडले.