Table Tennis Tournament । जळगावात उद्यापासून रंगणार राज्य टेबल टेनिस स्पर्धा

जळगाव : जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनतर्फे जळगावमध्ये ३० सप्टेंबरपासून आमदार चषक राज्य अजिंक्यपद (मानांकन) स्पर्धेचे आयोजन केले आहे. एकलव्य क्रीडा संकुल येथे सदर स्पर्धा ४ ऑक्टोबरपर्यंत होणार आहे.

राज्य असोसिएशनतर्फे दरवर्षी पाच राज्य स्पर्धा घेतल्या जातात त्यापैकी ही या वर्षाची ही चौथी स्पर्धा आहे. सर्व गटातील विजयी, उपविजयी तसेच उपांत्य तसेच उपांत्यपूर्व फेरीत पात्र खेळाडूंना राज्य असोसिएशनने दिलेल्या तक्त्यानुसार रोख बक्षिसे दिले जाणार आहे. या स्पर्धेसाठी विविध गटांचे मानांकन राज्य असोसिएशनने आज जाहीर केले. यामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू व अर्जुन पुरस्कार मिळवणारे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडूंचा सहभाग असणार आहे.

स्पर्धा आयोजन बाबत जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सल्लागार प्रा. चारुदत्त गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक झाली. यावेळी उपाध्यक्ष चंद्रशेखर त्रिपाठी, कार्याध्यक्ष प्रकाश चौबे, खजिनदार संजय शहा, सचिव विवेक आळवणी, सहसचिव राजू खेडकर, क्रीडा संघटक नितीन बर्डे, रवींद्र धर्माधिकारी, अॅड. विक्रम केसकर, अमित चौधरी, अमित शर्मा, शैलेश जाधव, विजय विसपुते, भरत मतानी आदी उपस्थित होते.

५३५ खेळाडूंचा सहभाग
एकलव्य क्रीडा संकुलातील या स्पर्धेसाठी इंडोअर हॉलमध्ये टेबल टेनिसचे आठ टेबल लावले आहे. शनिवार सायंकाळ पर्यंत राज्यभरातील ५३५ खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे. यात जळगावसह मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, परभणी, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, धुळे येथील खेळाडू स्पर्धेत खेळणार आहेत.