पुतळ्यांचे अनावरण कराल तर गुन्हे दाखल करू; प्रशासनाचा ‌‘उबाठा’ गटाला इशारा

जळगाव: मनपाकडून  महापालिका प्रशासकीय इमारत आणि पिंप्राळा येथे उभारण्यात आलेल्या दोन्ही राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांच्या रविवारी होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमांना शासनाने ब्रेक लावला आहे. मात्र पुतळ्यांच्या अनावरणाची राजकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणावरून नगरसेवकांमध्ये राजकीय वाद चिघळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर महापालिका प्रशासनाने नगरसचिव विभागाकडून याबाबत मार्गदर्शन मागवून घेतले. नगरसचिव विभागाने दोन्ही कार्यक्रम हे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शासकीय प्रोटोकॉलनुसार करण्यात येणार असल्याने तूर्तास हे दोन्ही कार्यक्रम करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने याप्रश्नी सावध पवित्रा घेतला आहे.

महापालिकेतर्फे प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचा तर पिंप्राळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. या दोन्ही पुतळ्यांचे अनावरण माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचे नियोजन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केले आहे. त्यानुसार त्यांनी जोरदार तयारीही केली आहे. तर लोकपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याही पुतळ्याचे अनावरण त्यांच्याच हस्ते करण्याचेही महापौरांचे नियोजन आहे. याच दरम्यान या दोन्ही पुतळ्यांचे अनावरण हे महापालिकांचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्याचे पत्र भाजप व शिवसेना (शिंदे गट) अशा एकूण 40 नगरसेवकांनी आयुक्तांना दिले होते. त्यावर आयुक्तांनी याबाबत थेट नगरविकास विभागाचे मत मागविले. त्याबाबतचा आदेश आज 8 रोजी दुपारी अडीच्या सुमारास आयुक्तांना प्राप्त झाले आहे.

कोनशिलेवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे हवे नाव : आयुक़्त

राजशिष्टाचारानुसार कार्यक्रमांच्या कोनशिलांवर मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह जिल्ह्याचे तिनही मंत्री यांची नावे असणे आवश्यक आहे. अशी नावे असतील तरच आपले नाव कोनशिलेवर घ्यावे अशी सूचना आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी राजकीय पदाधिकाऱ्यांना केली आहे.

शासकीय प्रोटोकॉलशिवाय कार्यक्रमाचे नियोजन

पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याच हस्ते करण्याचा चंग उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बांधला आहे. त्यानुसार त्यांनी या कार्यक्रमाची जोरदार तयारी केली आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उबाठा) गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांना निमंत्रणही देण्यात आले असून त्यांचा नियेोजित दौराही जाहीर झाला आहे. त्यानुसार ठाकरे हे सर्वप्रथम महापालिकेत येत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून सभा होईल.

राष्ट्रपुरूषांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून राजकीय वाद चिघळत असल्याने महापालिका आयुक्तांनी नगर विकास विभागाचे मत मागविले होते. त्यानुसार सदर कार्यक्रम राजशिष्टाचारानुसार व शासकीय नियमानुसार करण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांची वेळ व तारीख मिळताच तसे कळविण्यात येणार आहे. या पत्रानुसार आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक, महापौर, उपमहापौर यांना याबाबत पत्राव्दारे अवगत केले  आहे. असे असतानाही जर अनावरण केलने गेले तर सबंधितांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे.

मराठा संघटनांतर्फे उपस्थितीचे आवाहन 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्य्ाा पुतळ्याचे रविवारी 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अनावरण करण्यात येत आहे. याबाबत कोणीही राजकारण न करता कार्यक्रम होऊ द्यावा. नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड, लोक संघर्ष मोर्चा, संभाजी ब्रिगेड, छावा, मराठा प्रीमियर लीग, बुलंद छावा, मराठा महासंघ यांनी आज पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन केले. यावेळी मराठा सेवा संघाचे सुरेंद्र पाटील, लोक संघर्ष मोर्च्याच्या प्रतिभा शिंदे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुचिता पाटील, मराठा प्रीमियर लीगचे राहूल पवार, संभाजी ब्रिगेडचे शाम पाटील, तुषार सावंत आदी उपस्थित होते.

काय म्हटलंय शासन पत्रात

नगरविकास विभागाच्ो उपसचिव शंकर जाधव यांनी 8 सप्टेंबर रोजी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रानुसार, दोन्ही कार्यक्रम हे शासकीय कार्यक्रम राजशिष्टाचार पध्दतीने व शासकीय नियमानुसार अनावरण करावायाचे आहे. हे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांची तारीख मिळवण्याबाबतचा प्रस्ताव पाठविलेला आहे. त्यामुळे या दरम्यानच्या कालावधीत या पुतळ्यांच्या अनावरणाबाबचे कोणतेही कार्यक्रमाचे आयोजन करू नये.