जळगाव : हंडामोर्चात सहभागी न झाल्याने तालुक्यातील मन्यारखेडा येथे दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून एकूण सहा जणांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मन्यारखेडा येथे हंडामोर्चा काढण्यात आला होता. त्यात संजय बळीराम बागले (५४, रा. मन्यारखेडा, ता. जळगाव) हे सहभागी न झाल्याने गावातील बापू दगडू मोरे, सुनील बापू मोरे व अन्य एकाने लोखंडी पाईप बागले यांच्या डोक्यात मारला. त्यामुळे त्यांना दुखापत झाली. हे भांडण सोडविण्यासाठी बागले यांच्या विहीन मंगलाबाई या गेल्या असता एका जणाने कोयत्याने त्यांच्या हातावर मारले. त्यामुळे त्यांच्या हाताला दुखापत झाली. या तक्रारी वरून तिघांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार रवींद्र तायडे हे करीत आहेत.
दुसरी फिर्याद सुनील बापू मोरे (२२, रा. मन्यारखेडा, ता. जळगाव) यांनी दिली असून त्यात म्हटले आहे की, त्यांचे मामा ताराचंद महारु बागले यांच्या घराजवळ संजय बळीराम बागले व अन्य दोन जणांनी फिर्यादीचे वडील बापू मोरे यांच्या डोक्यात पावडा मारुन दुखापत केली. हे भांडण सोडविण्यासाठी ते गेले असता त्यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यावरून तीन जणांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक फौजदार हरीष पाटील हे करीत आहेत.