निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेला महत्व नाही ; मंत्री अनिल पाटील

नंदुरबार :  निवडणुकीपूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेला महत्व नसल्याचे मत मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केले. ते  नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांनी या दरम्यान माध्यमांशी संवाद साधत नुकताच जाहीर झालेल्या सर्व्हेवर प्रतिक्रिया दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, राज्य  सरकार शेतकरी, महिला आणि युवकांसाठी विविध योजना राबवत आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचे स्वागत शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. राज्यातील शेती पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान होत असून यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्याचे काम सरकारद्वारे करण्यात येत आहे.  त्यामुळे या सर्वांना कुठलाही अर्थ नाही आहे.

मंत्री पाटील यांनी, आगामी काळात पाच वर्षासाठी मुख्यमंत्री महायुतीचाच असेल, असा विश्वास  व्यक्त करत जागा वाटप करण्याचे अधिकार तिघा पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या असल्याचे स्पष्ट केले.

विदर्भ आणि मराठवाड्यात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. त्या ठिकाणी चार ते पाच दिवसाच्या आत मदत मिळणार. अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान, जनावरांचे नुकसान व घरांचे नुकसान झाले असेल यांचे सर्व पंचनामे येणाऱ्या चार ते पाच दिवसात पूर्ण केले जातील. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर तातडीने मदत करण्याचे काम केले जाणार असल्याचेही मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.