जळगाव : भारतात जवळच्या परिवारातील माणसांच्या नात्यातील गोडवा कायम वृद्धिंगत राहावा, यासाठी रक्षाबंधन, पाडवा, भाऊबीज चैत्रगौर, मंगळागौर यासह बरेच सण-उत्सव महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यापैकीच मकरसंक्रांतीच्या तीळगुळासह हलव्याची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. यावर्षी स्नेहीजनांसह नात्यातील गोडवा महागला आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी तिळाचे दर सुमारे ४० ते ५० च्या पटीत वाढले आहेत. त्यामागोमाग गुळ आणि हलव्याचे देखील दर वधारले आहेत.
भारतात विविध ऋतृकालमानानुसार सणउत्सवांचे स्वरूप आहे. नारळी पौर्णिमा, भाऊबीज, पाडवा व त्यानंतर हिवाळा आणि ऊन्हाळ्याच्या दरम्यान हवामानातील बदल शरीराला वर्धक असावा, यानिमित्ताने मंकरसंक्रातीला तीळ आणि गुळाला अधिक महत्त्व आहे. प्रत्येक घरी एकमेकांना तिळगुळ घ्या…गोड गोड बोला म्हणत तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे. यावर्षी मकरसंक्रांतीसाठी तीळ बाजारात विक्रीसाठी आले आहेत. परंतु, नात्यातील गोडवा वाढविणार्या या सणाला महागाईची झळ बसली आहे. गेल्या वर्षी तीळाचे दर १५० ते १६० रुपये किलो होते. यावर्षी तिळाच्या दरात सुमारे ४० ते ५० रुपये प्रति किलोने दरवाढ झाली आहे. भाव वाढीसह मकर संक्रांत सण तोंडावर असताना तिळाच्या किरकोळ दरात किमान १० ते १५ रुपयांची वाढ होत असल्याचे किराणा विके्रत्यांकडून बोलले जात आहे.
यावर्षी तीळाचे दर २२० ते २२५ रुपये प्रति किलो दर आहे. यासोबतच तिळासोबत लागणारा गुळाचे दरही ३५ ते ४० रुपये प्रति किलो आहे. यापाठोपाठ तिळगुळासोबत लागणारा हलवा ही महागला आहे.
दर वाढले तरी मागणी कमी नाही.
एकीकडे तिळाचे दर वाढलेले असतानाही तीळ व गुळाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. संक्रांत सणानिमित्त महिलांवर्गाकडून तीळ-गुळ, हलव्यासोबत वाण देण्यासाठीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सध्या बाजारपेठेत गर्दी होत आहे. किराणा दुकानासह रस्त्यावर हातगाडी ठेल्यांवर असलेल्या तीळ व गूळ विक्रेत्यांकडेही महिलांची गर्दी दिसत आहे. मात्र सद्यास्थितीत दर वाढलेले असले तरी तीळ व गूळ खरेदीवर कोणताही परिणाम दिसून आलेला नाही.
उत्पादना घट झाल्यामुळे दरवाढ
गेल्या दोन तीन वर्षांपासून मान्सूनदरम्यान सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीने ज्वारी, बाजरी, उडीद, मूगासह अन्य शेतीउत्पादनाचे नुकसान झाले आहे. त्यात तीळही अपवाद नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य तीळ उत्पादक राज्यांमधील तिळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी व मागणी वाढली आहे. परिणामी तिळाच्या दरात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात रावेर यावल तसेच शहादा, नवापूर नंदूरबार आदी सीमावर्ती भागातून मध्य प्रदेश, गुजरात तसेच उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, ओरिसा अन्य राज्यातूनदेखील तिळाची मागणी व्यापार्याकडून नोंंदवली जाते.
असे आहेत दर गतवर्षी यावर्षी दर
तीळ…………. १६०………..१९० ते २१० रुपये
गूळ……………….३०………….३५ ते ४० रुपये
हलवा……………१२०………..१५० रुपये