तरुण भारत लाईव्ह ।१० जानेवारी२०२३। लहान बालगोपालांचा विशेषतः महिलांच्या संक्रांतीचे वाण देण्याचा मकर संक्रांतीचा सण आठवडयावर येवून ठेपला आहे. त्यामुळे बाजारात तीळ उत्पादनाला मागणी वाढली आहे. पर्यायाने 140 ते 150 रुपयांदरम्यान असलेल्या तिळाच्या दरात गेल्या 8-10 दिवसांपासून सुमारे 50 ते 60 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे तिळाचा गोडवा काहीसा महागला असल्याचे दिसून येत आहे.
दक्षिणेकडे असलेल्या सूर्याचे डिसेंबरनंतर मकर वृत्ताकडे स्थित्यंतर सुरू होते. यादरम्यान हिवाळ्याच्या दिवसात तिळाच्या पदाथांचे सेवन करणे आरोग्यास हितकारक आहे. जानेवारीच्या मध्यावर महिलांसह लहान बालगोपालांसाठी आनंदाचा गोडवा वाढविणार्या मकर संक्रांतीला तिळ-गुळ दिले जाते. तसेच महिलांकडून तिळाचे लाडूंसोबतच वाण दिले जाते. या पार्श्वभूमीवर बाजारात तिळाच्या उत्पादनाला मागणी वाढली आहे. डिसेंबरअखेर तिळाचे दर 140 ते 150 रुपये किलो दरम्यान होते. त्यात मकर संक्रांतीची मागणी लक्षात घेता तसेच बाजारातील कमी प्रमाणात होणारी आवक पहाता तिळाच्या दरात तब्बल 50 ते 60 रुपयांनी वाढ झाली आहे.
तीळ शेंगदाणा तेलवर्गीय बियाणे उत्पादनाची कमतरता
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना रोजगार
हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर तिळ-गुळाचे लाडू वड्या आदींचा गृहउद्योग मोठ्या प्रमाणावर आहे. बाजारात दहा ते बारा लाडू किंवा वड्यांचे तिळाचे पाकीट 75 ते 90 रुपयांपर्यंत मिळत आहेत. यातून बचत गट अथवा गृहउद्योगातून महिलांना बर्याच प्रमाणात रोजगार मिळाला आहे. तसेच स्थानिक स्तरावर बचत गटाकडून महिलांच्या या तीळ-गुळ वड्यांना बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
मेहनत आणि न परवडणारे मजुरीचे दर यामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात शेतकरी वर्गाकडून तीळ, शेंगदाणे वा अन्य तेलबिया वर्गीय उत्पादन घेण्याकडे कल कमी झाला आहे. खरीपात मान्सून संपण्यापूर्वीच तीळ उत्पादनाची कापणी आणि काढणी केली जाते. इतर अन्नधान्य उत्पादनासोबत बाजारात आणली जाते. परंतु मेहनत आणि काढणीचा खर्च परवडणारा नसल्याने शेतकरी वर्गाकडून तिळीच्या उत्पादनाऐवजी मका, बाजरी, गहू, कपाशी आदि उत्पादनाकडे शेतकरी वळले आहेत. त्यामुळेदेखील तीळवर्गीय उत्पादनात भाववाढ झालेली दिसून येत आहे.